Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Monday, January 26, 2015

अखेर त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली…

गेल्या काही दिवसांपासून जी बातमी येऊ नये असं वाटत होतं, ती बातमी अखेर आली. आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या ‘common man’ ला जन्म देणार्‍या आर. के. लक्ष्मण यांनी अखेर आपला निरोप घेतला.

लिहिता-वाचता येण्यापूर्वीच, म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या पहिल्या दशकापासूनच नियतकालिकांमधल्या रेखाचित्रांमध्ये गुंगून जाणार्‍या एका छोट्या मुलानं पुढं अनेक दशकं असंख्य भारतीयांना आपल्या रेखाचित्रांमध्ये गुंगवून ठेवलं. रेषांचं सामर्थ्य काय असतं हे दाखवून देऊन त्यांनी आपलं लक्ष्मण हे नाव जणू सार्थ ठरवलं. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश न मिळाल्यानं खचून न जाऊन त्यांनी आपली पेन्सिल खाली ठेवली नाही, हे आपलं सद्भाग्यच!
‘टाइम्स ऑफ इंडिया’ मधून आपल्याला भेटायला येणार्‍या या ‘common man’ नं तत्कालीन परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी केलीच, पण त्याचबरोबर अनेकदा ही टिप्पणी कालातीत बनून गेली. उदाहरणादाखल हे रेखाचित्र,

त्यांचे ज्येष्ठ बंधू आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ साठी त्यांनी काढलेली चित्रंदेखील तितकीच बोलकी होती. त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेला आणखी एक दोस्त म्हणजे एशियन पेंट्सचा ‘गट्टू’. 
त्यांनी रेखाटलेलं प्रत्येक पात्र हे अगदी साधं आणि आपलंसं वाटतं. त्यामुळेच आज एका कलाकाराला मुकल्याचं दुःख आहेच, पण त्याचबरोबर आपल्या अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी पोकळी निर्माण झालीये. 

Wednesday, March 5, 2014

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - ३


१९२० सालच्या उन्हाळ्यातील एक निवांत दुपार. केम्ब्रिज विद्यापीठाच्या दिग्गज प्राध्यापकांपैकी काही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर चहा पीत गप्पा मारत बसली होती. तितक्यात उपस्थितांपैकी एका बाईंनी कपात चहा आधी ओतला की दूध यानुसार चहाची चव बदलते असं मत व्यक्त केलं. जमलेली सारीच मंडळी विद्वान. त्यामुळे काहींनी एकूणात मिश्रण तेच असल्यानं क्रम बदलून काय फरक पडणार अशी टिप्पणी केली. अचानक एक किरकोळ अंगयष्टीचा तरूण पुढे आला. "दुधात चहा ओतला आणि चहात दूध ओतलं तर चवीत फरक पडतो की नाही हे प्रयोग करून तपासून पहायला हवे " असं त्यानं सुचवलं. सर्वप्रथम त्या बाईंना तयार चहाचा एक कप देऊन तो कोणत्या प्रकारे बनवला आहे हे ओळखण्यास सांगायचं असं ठरलं. प्रत्यक्षात दोन्ही प्रकारच्या चहाच्या चवींमध्ये काही फरक नसला, तरी अंदाजाने उत्तर सांगून ते बरोबर येण्याची शक्यता ५० टक्के आहे. त्यामुळे हा प्रयोग एकापेक्षा जास्त वेळा करायला हवा. शिवाय बनवणार्‍यानं समजा मिश्रण नीट ढवळलं नाही, तर त्याचा परिणामही चवीवर होऊ शकेल. त्यामुळे अशा परिस्थितीत सगळे कप अचूकपणे ओळखण्याची अपेक्षा करणं गैर ठरेल. हे कप कोणत्या क्रमानं दिले जात आहेत, यावरही चव ओळखणं / न ओळखणं अवलंबून असू शकेल. या सर्व शक्यतांचा विचार करून त्या तरूण शास्त्रज्ञानं किती कप, कोणत्या क्रमानं दिले पाहिजेत आणि खरंच जर चवीत फरक असेल, तर किमान किती कप अचूकपणे ओळखता आले पाहिजेत याचं गणित मांडलं. हा तरूण शास्त्रज्ञ म्हणजेच आधुनिक संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे सर रोनाल्ड फिशर. यातूनच पुढे फिशर यांनी “Design of Experiments (DoE) & Analysis of Variance (ANOVA)” या संकल्पनांचा विकास घडवून आणला.

आज बहुतेक सर्व क्षेत्रात DoE & ANOVA या संख्याशास्त्रातील तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. शेतात कोणत्या प्रकारचं खत, किती प्रमाणात वापरलं तर उत्पादनात वाढ होते हे ठरवायला याच तंत्राची मदत होते. अनेक शेतांमध्ये एकाच वेळी हा प्रयोग करायचा झाल्यास, प्रत्येक ठिकाणच्या मातीचे घटक वेगवेगळे असल्यामुळे खताच्या परिणामांमध्ये तफावत जाणवू शकते. ही तफावत दूर करून खताचा परिणाम अचूकरीत्या मोजणं, वेगवेगळ्या खतांची तुलना करून त्यांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवणं हे सगळं या तंत्राद्वारे शक्य होतं. जी गोष्ट झाडांबाबत घडते, तीच माणसांची. म्हणूनच, नवीन औषध बाजारात आणण्यापूर्वी करण्यात येणार्‍या चाचण्यांमध्येही हे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. प्रत्येक रूग्णाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असल्यामुळे औषधाचा परिणामही कमी-जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे साधारण समान (वय, लिंग, वजन, आजाराची स्थिती इत्यादी) प्रकारच्या माणसांवरच एखाद्या औषधाची चाचणी केल्यास, ते औषध इतर प्रकारच्या व्यक्तींमध्ये प्रभावशाली ठरेल याची खात्री देता येत नाही. शिवाय नवीन येणारे औषध हानीकारक तर नाही ना (Side Effects) हे ठरवण्यासाठी देखील प्रायोगिक स्तरावर किमान किती लोकांना ते दिले पाहिजे, हे या तंत्राद्वारे ठरवलं जातं. दोन औषधांची तुलना करायची झाल्यास ती औषधे ज्या दोन गटांना दिली जातील, ते गट साधारणतः समान गुणधर्मांचे असायला हवेत. यामुळेच अलिकडच्या काळात, सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेसाठी, एकाच व्यक्तीच्या डाव्या हाताला एक आणि उजव्या हाताला दुसरं क्रीम लावूनही चाचण्या केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या समूहांवर केलेल्या या सगळ्या चाचण्यांमधील परिणामांची तुलना करून त्यावरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याचं काम संख्याशास्त्रातील हे तंत्र करतं. अशा प्रकारे जिथे जिथे म्हणून विविधता आहे, तिथे तिथे हे तंत्र उपयोगी पडतं.

Thursday, March 14, 2013

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - २

सफर संभाव्यतेच्या  विश्वातील - १

“To understand God's thoughts we must study statistics, for these are the measure of his purpose.”
- Florence Nightingale

मार्च महिना म्हटलं  की  आठवण होते ती आंतरराष्ट्रीय महिला दिनाची. म्हणूनच आज दोन महिला संख्याशास्त्रज्ञांचा परिचय करून घेऊयात. त्यांपैकी पहिली म्हणजे फ्लोरेन्स नाईटिंगेल.  परिचारिका म्हणून तिचं काम आपल्याला माहित असतं. पण हीच नाईटिंगेल संख्याशास्त्राच्या क्षेत्रातही नावाजलेली आहे.  १८५९ मध्ये 'Royal Statistical Society' ची पहिली  महिला सभासद  होण्याचा सन्मान नाईटिंगेलला लाभला. माहितीचं  सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा आलेखात रुपांतर करण्याचं  तिचं  कौशल्य वाखाणण्याजोगं होतं . त्यामुळेच दुर्लक्षित राहिलेला सैनिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यात तिला यश मिळालं . त्यापूर्वीचे संख्याशास्त्रीय अहवाल भलेमोठे, किचकट असल्याकारणानं सहसा राजकारण्यांकडून वाचले जात नसत. त्यामुळे त्या अहवालातील समस्यांवर उपायही शोधले जात नसत. याउलट चित्रात्मक मांडणीमुळे नाईटिंगेलचे अहवाल लोकांना सहज समजले आणि त्यामुळे समस्येचं गांभीर्य लक्षात येऊन  त्यावर उपाययोजना केल्या गेल्या.
संख्याशास्त्राच्या क्षेत्रातील नाईटिंगेलचं सर्वात महत्त्वाचं  योगदान म्हणजे,  तिने प्रकाशात आणलेले नाईटिंगेल रोझ प्लॉट.  आजकाल मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 'पाय आकृती'चंच हे दुसरं  रूप. वर्तमानपत्रात  पाय आकृती आपण नेहमीच पाहतो. विशेषत:  'रुपया असा आला, असा गेला' किंवा 'वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचणाऱ्या  लोकांचे प्रमाण' अशा प्रकारच्या माहितीचं रुपांतर रंगीबेरंगी पाय मध्ये केलं जातं.  याचंच थोडं वेगळं  रूप म्हणजे नाईटिंगेल रोझ प्लॉट. या  आकृतीचा वापर साधारणत: मासिक/साप्ताहिक  माहितीसाठी केला जातो. याचं  वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळाच्या प्रत्येक पाकळीचा कोन हा सारखाच असतो. पण प्रत्येक पाकळीची त्रिज्या (लांबी), ही वेगवेगळी असते. त्यामुळे मूळ पाय आकृतीप्रमाणेच यातही पाकळीचे क्षेत्रफळ हे त्या क्षेत्राच्या योगदानाच्या प्रमाणात असते. 
Nightingale Rose Plot
भारतीयांशी देखील नाईटिंगेलचे विशेष नाते आहे. १८६३   ते १८७३ या दहा वर्षांच्या कालावधीत नाईटिंगेलच्या प्रयत्नांमुळे भारतातील सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण हजारी ६९ वरून १८ वर आले.


अशीच दुसरी एक संख्याशास्त्रज्ञ म्हणजे जेनेट लेन क्लेपन.  क्लेपन ही देखील  खरं  तर वैद्यकीय क्षेत्रात होती. १९१२   साली तिनं पहिला 'Cohort Study' केला. Cohort म्हणजे काहीतरी एक गुणधर्म समान असणाऱ्या अनेक लोकांचा समूह. साधारणत: एकाच वेळी जन्माला आलेल्या १००० मुलांच्या वाढीचा तिनं अभ्यास केला. यांपैकी ५००  मुलांना आईचं दूध दिलं  गेलं  होतं  तर उरलेल्या ५००  मुलांना गाईचं दूध देण्यात आलं होतं. संख्याशास्त्रातील 't -test' आणि इतर काही साधनांचा वापर करून आईचं  दूध मिळालेल्या मुलांची वाढ अधिक चांगल्या रीतीनं होत असल्याचं  तिनं सिद्ध केलं. हा फरक आर्थिक स्थिती अथवा इतर कारणांवर अवलंबून नाही किंवा निव्वळ योगायोगही नाही हेही तिनं संख्याशास्त्रीय साधनांनी दाखवून दिलं.
पुढच्या काळात तिने 'Case Control Study' करून स्तनाच्या कर्करोगाची कारणे शोधून काढली. ५०० कर्करोगी महिला (Case) आणि साधारण समान स्थितीतील (वय, सामाजिक स्तर इत्यादी) ५०० इतर महिला (Control) यांच्याकडून  भरून घेतलेल्या ५० प्रश्नांच्या प्रश्नावलीतील उत्तरांवरून संख्याशास्त्राच्या साह्याने तिने कर्करोगाची कारणे  शोधून काढली. नंतरच्या काळात इतर संशोधकांनीही तसेच निष्कर्ष काढल्यामुळे  तिने दिलेली कारणे  आजतागायत वापरली जातात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात दुहेरी डॉक्टर (MD + PhD) पदवी मिळवणाऱ्या फार थोड्या लोकांपैकी एक क्लेपन होय.
आजच्या पाय दिनाच्या दिवशी या दोन महिला संख्याशास्त्रज्ञांना अभिवादन करून थांबते.

Thursday, January 31, 2013

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - १

२०१३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष', म्हणून साजरं  केलं  जातंय. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित / संख्याशास्त्र म्हटलं  की "भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर", याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची  गणितं  उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं  झालं  तर १९४७ सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं  कंत्राट सरकारनं एका कंत्राटदाराला दिलं  होतं. पण किल्ल्यात नेमके किती लोक आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हतं. शिवाय परिस्थिती स्फोटक असल्यानं प्रत्यक्ष आत जाऊन मोजणी करणं अशक्य होतं.  साहजिकच कंत्राटदारानं भरमसाठ रकमेचं  बिल दिलं. त्या वेळी जे. एम. सेनगुप्ता नावाच्या एका संख्याशास्त्रज्ञानं एक क्लृप्ती लढवली. सगळ्या अन्नपदार्थांमध्ये मीठ हे सगळ्यात स्वस्त होतं. त्यामुळे वापरल्या गेलेल्या मिठाचं प्रमाण वाढवून दाखवून कंत्राटदाराच्या फायद्यात फारशी वाढ होणार नव्हती. त्यामुळे कंत्राटदारानं वापरलेल्या मिठाचं प्रमाण आणि सामान्यपणे आहारात वापरल्या जाणाऱ्या  मिठाचं दरमाणशी प्रमाण, यांचा वापर करून सेनगुप्ता यांनी संख्याशास्त्राच्या मदतीनं लाल किल्ल्यातल्या निर्वासितांच्या संख्येचा अंदाज बांधला.  दिल्लीतल्याच दुसऱ्या एका छोट्या छावणीतल्या निर्वासितांची प्रत्यक्ष गणना करून ही पद्धत उत्तमरीतीने काम करत असल्याचं  सिद्ध झालं. 
अशा या संख्याशास्त्रातील  Jacob Bernoulli   या महान शास्त्रज्ञाने लिहिलेल्या "Ars Conjectandi" या मूलभूत निबंधाच्या प्रकाशनास यंदा ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर अनेकविध क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या Bayesच्या प्रमेयाचा शोध लागूनही यंदा २५०  वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं जगभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. सर्वसामान्य जनता आणि संख्याशास्त्र यांच्यातील दरी कमी व्हावी म्हणूनही काही खास प्रयत्न केले जात आहेत. तुम्हालाही या दुनियेची सफर करायची असेल तर www.statistics2013.org या संकेतस्थळास अवश्य भेट द्या. तेथेच आपल्याला दैनंदिन जीवनात कुठे - कुठे  संख्याशास्त्र भेटू शकतं  यासंबंधी SAS या कंपनीनं बनवलेला छोटासा व्हिडीओ देखील बघायला मिळेल.  आणि संख्यांना कशा निरनिराळ्या प्रकारे कामाला लावता येऊ शकतं  हे आपल्या मायबोलीत ऐकायचं असेल तर पुणे विद्यापीठाचे  माजी संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल गोरे यांनी रचलेलं गीत ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल.  

Friday, December 14, 2012

जपानी (日本語) शिकताना - 3


हिसाशीबुरी  दा ना (खूप दिवस झालेत ना आपण भेटून ..). आजच्या भागात एका भाषेत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलायला गेलं  की  कशा गमती होतात ते बघूयात .

याचं अगदी क्लासिक उदाहरण आमच्या भावना सेन्सेई नेहमी सांगतात. एकदा एका मुलाला "काल क्लासला का आला नाहीस? " असं  विचारल्यावर "मे गा किमाशीता (शब्दश: भाषांतर: डोळे आले होते.)" असं  उत्तर मिळालं . आता सेन्सेई पण मराठीत विचार करू शकत होत्या म्हणून ठीक. पण एखाद्या जपान्यानी हे उत्तर ऐकलं  कि तो बिचारा सॉलिड गोंधळणार हे काय प्रकरण आहे म्हणून....

 आणखी एक उदाहरण त्यांनीच सांगितलेलं... एकदा जपानमधल्या एका कंपनीत मीटिंग सुरु होती.   मीटिंग बरीच लांबल्याने थोडा ब्रेक घ्यावा असं  ठरलं.  भारतीय मंडळी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये बसून पुढचा अजेंडा ठरवत होती. तितक्यात एका जपानी माणसाचा फोने आला. ही सारी कॅन्टीन मध्येच आहेत हे कळल्यावर तो जपानी माणूस म्हणाला, "We will also go". हे ऐकून भारतीय माणूस वैतागला. आपण ह्यांना उशीर होऊ नये म्हणून बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जेवतोय आणि आता हे कुठे निघालेत..शेवटी जेव्हा दुभाष्या मध्ये पडला तेव्हा कळलं की  तो जपानी माणूस प्रत्यक्षात "आम्ही कॅन्टीनमध्ये येतोय", असंच  सांगत होता. पण जपानीत आपली आहे ती जागा सोडणं म्हणजे "जाणं " असल्यामुळे त्यांनी शब्दश: भाषांतर करून "We will come" च्या ऐवजी "We will go", असा शब्दप्रयोग केला. सुदैवानं, दुभाष्याला हे बारकावे माहित होते म्हणून ठीक... 

कालही वर्गात अशीच मजा झाली. एखाद्या गोष्टीचं  कारण कसं  सांगायचं  तो वाक्याचा प्रकार आम्ही शिकत होतो. उदाहरणादाखल प्रत्येकानी एकेक वाक्य बनवा असं सेन्सेईनी सांगितलं . माझ्या एका मैत्रिणीनी "काल लग्नाला गेल्यामुळे मी क्लासला आले नव्हते" असं वाक्य बनवायचं ठरवलं. आता मराठीत स्वत:चं  असो की  दुसऱ्याचं, लग्न ते लग्नच. पण जपानीत लग्न समारंभाला वेगळा शब्द आहे. त्यामुळे "काल मी लग्नाला गेले होते" याचं  शब्दश: भाषांतर केलं की "काल माझं  लग्न होतं", असा अर्थ निघतो. साहजिकच तिचं वाक्य ऐकताना हा फरक माहित असणाऱ्यांची हसून पुरेवाट झाली.  

परवा असाच एक घोळ मी पण केला. "जिंको" म्हणजे Population, असंच लक्षात असल्यामुळे bacteria ची जिंको असा शब्दप्रयोग मी वापरला. आता खरं  तर जिंको म्हणजे लोकसंख्या. त्यामुळे मी नक्की bacteriaच्या संख्येबद्दल बोलतीये की माणसांच्या हे न कळल्यामुळे समोरची जपानी मुलगी पूर्णच गोंधळली आणि मला हा प्रकार कळलाच नाही. नंतर एका मैत्रिणीने जिंकोतला जीन म्हणजे माणूस हे लक्षात आणून दिल्यावर माझी ट्यूब पेटली. शब्द वापरण्यापूर्वी कांजी डोळ्यापुढे आणणं  सेन्सेईना का गरजेचं  वाटतं ते मला पहिल्यांदा इतक्या प्रकर्षाने  जाणवलं.  

असंच आणखी एकदा आम्ही काही वाक्य बनवत होतो. माझ्या मैत्रिणीनी "जखम झाली की रक्त येतं " असं  वाक्य बनवलं. नेहमीप्रमाणेच वाक्य आधी मराठीत बनवून नंतर जपानीत भाषांतर केलं आणि मग झाली कीपरत गडबड. जपानीत आतून बाहेर यायला वेगळा शब्द आहे. आणि तो न वापरल्यामुळे रक्त असं समोरून पळत पळत भेटायला  येतंय असं दृश्य डोळ्यापुढे आलं  आणि आम्ही पोट धरून हसायला लागलो.

पूर्वी एका लेखात मराठी पुस्तकं इंग्रजीत भाषांतरित करताना "जेवायला पाने घेतली", "लोक तमाशा बघत होते" अशा वाक्प्रचारांचे भाषांतर करताना विशेष काळजी घ्यावी लागते हे वाचला होतं . आता दिवसेंदिवस त्याचा प्रत्यय यायला लागलाय...

Wednesday, August 15, 2012

डॉ. सुखात्मे - नीलफलकाच्या निमित्ताने


आजच्या स्वातंत्र्यदिनी भारतमातेच्या एका सुपुत्राबद्दल लिहावं वाटलं, म्हणून ही पोस्ट. आजवर अनेक क्षेत्रात अनेक महान हस्ती होऊन गेल्या. पण बहुतेकदा त्या त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोहोचतही नाही. कधी कधी तर अगदी आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या दिग्गजांचीही आपल्याला माहिती नसते. "पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती"च्या नीलफलक लावण्याच्या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमामुळे आपण सामान्य लोक निदान आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ - श्रेष्ठांना ओळखायला लागूत.
नीलफलकाची ही कल्पना मुळात लंडनमधली. लोकमान्य टिळकांच्या तिथल्या वास्तव्यस्थानी असा फलक लावला गेला, तेव्हा त्याने प्रेरित होऊन जयंत टिळक आणि दीपक टिळक यांनी असा उपक्रम इथे सुरु केला. काळकर्त्या शि. म. परांजपेंपासून सुरुवात करून आजवर या समितीने पुण्यात 116 फलक लावलेत.
मागच्या रविवारी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. सुखात्मेंच्या प्रभात रोडवरील "सांख्यदर्शन" या घरावर 116 व्या फलकाचे अनावरण झाले. डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे - संख्याशास्त्रात जागतिक स्तरावर पोचलेलं नाव. लंडनमध्ये संख्याशास्त्रात Ph. D. करून भारतात परतल्यावर बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी त्यांनी अर्ज केला. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पं . मदनमोहन मालवीय डॉ. सुखात्मेंच्या शैक्षणिक गुणवत्तेने प्रभावित झाले खरे, पण संख्याशास्त्राचा भारताला गरिबीतून बाहेर काढायला कसा उपयोग होणार या पंडितजींच्या प्रश्नाला समर्पक उत्तर न देता आल्याने डॉ. सुखात्मेंनी याच प्रश्नाला आपलं जीवनध्येय बनवलं. बनारस विद्यापीठातील प्राध्यापकपद न स्वीकारता राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत (ICAR) संख्याशास्त्रात संशोधक म्हणून त्यांनी काम सुरु केले. त्यांच्या अनमोल कार्यामुळे आज या संख्याशास्त्र विभागाचा विस्तार होऊन एक नवी संस्था IASRI उभी राहिलीये. भूक, कुपोषण या समस्यांवरील त्यांचं काम जगभर नावाजलं गेलं आहे.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या वतीने दर दोन वर्षाने एका ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञाला "डॉ. सुखात्मे पुरस्कार" दिला जातो. 2003-04 साली डॉ. बी. के. काळे तर 2011-12 साली डॉ. जे. व्ही. देशपांडे अशा दोन पुणेकरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहजिकच या नीलफलकाचे अनावरण डॉ. जे. व्ही. देशपांडे यांच्याच हस्ते करण्यात आले. त्यामुळे डॉ. सुखात्मेंच्या कार्याबद्दल डॉ. देशपांडेंच्या तोंडून "सांख्यदर्शन" मध्ये ऐकायला मिळणं आणि त्यानिमित्तानं अनेक संख्याशास्त्रज्ञांना भेटणं ही माझ्यासारख्या संख्याशास्त्राच्या विद्यार्थिनीसाठी पर्वणीच होती. शिवाय पद्मश्री डॉ. सुहास सुखात्मेंची भेट आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या वडिलांच्या आठवणी ऐकणं हा तर एक अनपेक्षित बोनस होता. अशा रीतीने स्वातंत्र्यदिना पूर्वीचा रविवार एका उत्तम कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद देऊन गेला.

Wednesday, May 16, 2012

जपानी (日本語) शिकताना - 2

जपानी ( 日本語 ) शिकताना - 1

आमचा जपानीचा क्लास सुरु झाल्यावर थोड्याच दिवसात म्हणजे 6 ऑगस्टला "तानाबाता फेस्टिवल" होता. आकाशगंगेमुळे एकमेकांचा विरह सहन कराव्या लागणाऱ्या ओरिहीमे आणि हिकोबोशी या दोन ताऱ्यांचा भेटण्याचा दिवस म्हणजे हा सण. ओरिहीमे ही तेन्तेईची (आकाशाच्या राजाची) मुलगी. लग्नानंतर दोघांचंही आपआपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ लागल्यानं चिडून तेन्तेईने दोघांना आकाशगंगेच्या दोन बाजूंना टाकलं. विरहानं दु:खी झालेल्या ओरिहीमेवर दया आल्यानं मग तेन्तेईने वर्षातून एकदा म्हणजे चांद्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी दोघांना भेटण्याची परवानगी दिली. तो दिवस म्हणजे तानाबाता फेस्टिवल. ही सारी गोष्ट ऐकताना चंद्र-दक्ष-रोहिणी यांची चंद्राच्या क्षय-वृद्धी संबंधातली कथा आठवली. आणि जाणवले, संस्कृती भारतीय असो की जपानी की आणखी कुठली. सण - उत्सवांच्या कथांचा मूळ गाभा तोच.

नंतर आले ते कोरे, सोरे, आरे, दोरे. थोडक्यात हे, ते, ते तिथले आणि कोणते. यांच्यानंतर "वा" पार्टिकल लावून "कोरे वा कोकुबान देस" म्हणजे "हा फळा आहे", अशी वाक्ये सुरु झाली. मग कुणीतरी शोध लावला. बहुदा "दुरून डोंगर साजरे " प्रमाणे जपानी लोकांना दूरच्या वस्तू आवडतात. म्हणून दूरच्या वस्तूबद्दल बोलायची सुरुवातच " आरे वा" अशी होते. हे सारं अचल वस्तूंसाठी. साधारण अशाच धर्तीवर चल - अचल सर्वांसाठी चालणारे हे, ते, त्या तिथले आणि कोणते म्हणजे कोनो, सोनो,  आनो, दोनो . इथे, तिथे, त्या तिकडे आणि कुठे असं जागेबद्दल बोलायचं झाला की कोको, सोको,  आसोको, दोको; दिशांबद्दल बोलायचं झालं की कोचिरा, सोचिरा, आचिरा, दोचिरा; अशी को, सो, आ, दो ची जणू नवी बाराखडीच शिकायला मिळाली.

त्यानंतर शिकवली गेली ती वेगवेगळ्या देशांची जपानीतील नावे. भारत, इंडिया, हिंदुस्तान इतकी नावे कमी आहेत की काय म्हणून आता जपानीत भारताला "इंदो" म्हणायचं हे कळले. तीच गत आपल्या शेजाऱ्याची . चायना, चीन आणि आता च्यूगोकू . "देशवासीय" म्हणजे "~जिन ". म्हणजे आपण सारे "इंदोजिन". एकूणच या साऱ्यामुळे "भाषा" या प्रकाराचा धसका बसला की मग कुठल्याही भाषेचं नाव काढलं की पळून जायची इच्छा होणार, हे जाणूनच बहुदा प्रत्येक भाषेच्या नावानंतर “go” लावायची पद्धत आहे जपानीत. आपली मातृभाषा मराठीगो, राष्ट्रभाषा हिंदीगो आणि सध्या आपण शिकतोय निहोन्गो.

शिवाय नम्रपणे बोलायचं झालं तर शक्यतो आपल्या समोरच्या व्यक्तींना कधीही तू / तुम्ही म्हणायचं नाही . समजा वीणा नावाच्या मुलीला, तुला काय आवडतं , असं विचारायचं असेल तर “तुम्हाला काय आवडतं ” असं न विचारता “वीणासानला काय आवडतं ” असं विचारायचं . म्हणजे एखाद्या भारतीयानं हे ऐकलं तर अगं मग ती कोण वीणा तिलाच विचार नं, दुसऱ्यांना कशाला विचारतेस असा अनाहूत सल्ला येणार. पण मग थोडा विचार केला आणि “आऊसाहेबांची काय आज्ञा आहे आमच्यासाठी?” असं जिजाऊना आदरपूर्वक विचारणारे शिवराय आठवले.

एकूणात काय तर दोन भाषांमधली साम्यस्थळे आणि भेदस्थळे यांचा अभ्यास करणं हे मजेशीर ठरतंय.

Monday, April 30, 2012

जपानी (日本語) शिकताना - 1

खूप दिवसांपासून, खरं तर खूप वर्षांपासून एखादी परदेशी भाषा शिकायचा विचार करत होते. पण काही न काही कारणानं ते टळतच गेलं. शेवटी मागच्या जून - जुलैत सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि ऑगस्ट मध्ये अस्मादिकांचं जपानी प्रशिक्षण सुरु झालं. जपानी, चीनी भाषा म्हटलं की पहिली आठवते ती किचकट चित्रलिपी. त्यामुळेच बहुदा मी कुठलीही युरोपीय भाषा न निवडता जपानी निवडली. शिवाय शिस्तप्रिय आणि कमी साधनसंपत्तीच्या जोरावरही समृद्ध, प्रगत बनलेल्या, अणुबॉम्बमुळे बेचिराख होऊनही फिनिक्सप्रमाणे उड्डाण करणाऱ्या जपान बद्दल इतर देशांपेक्षा जरा जास्तच आपुलकी होती ती वेगळीच.

“はじめまして(हाजीमेमाश्ते)” असं म्हणून एकमेकांशी ओळख झाली आणि मग सारे वर्गमित्र हे ~さん(सान) बनले. प्रत्येकाच्या नावानंतर सान लावूनच हाक मारायची जपानी नम्रता अंगी बाणवायचा प्रयत्न सुरु झाला. स्वाती 先生 (सेन्सेई - teacher) आणि हर्षदा 先生 च्या मदतीनं, आम्ही जपानीच्या बालवाडीत प्रवेश केला. जपानला जपानीत “ 日本 (निहोन किंवा निप्पोन)” म्हणतात हे ऐकून "इंडिया - भारत"ची आठवण झाली आणि एक समान धागा मिळाला. जपानी राष्ट्रध्वजाचं वर्णन आणि इतर तांत्रिक माहिती घेऊन आमचा वर्ग सुरु झाला.

सुरुवातीला फक्त मौखिक असणाऱ्या या भाषेत आता ३ लिपी आहेत – हिरागाना, काताकाना आणि कांजी . हिरागाना आणि काताकाना या प्रत्येकी ४६ अक्षरांच्या वर्णमाला आणि कांजी ही पारंपारिक चीन कडून आयात केलेली चित्रलिपी. कांजींची संख्या तर हजारोत. त्यामुळे यंदा आपल्याला हिरागाना, काताकाना आणि १५० कांजी शिकायच्या आहेत हे ऐकून धडकीच भरली. चौकोनात प्रमाणबद्धपणे आणि ठराविक दिशेने आणि क्रमाने रेषा काढून वहीत उमटणारी अक्षरं मनाला आनंद द्यायची. पण हीच अक्षरं त्याच्या रेषाक्रमासह (stroke order) लक्षात ठेवणं अवघड जाई. शिवाय, अक्षरांचे उच्चार आठवणं म्हणजे अजूनच तारांबळ. हिरागानातला “से” थोडा थोडा देवनागरीतल्या “ए” सारखा दिसतो. मग इतक्या वर्षांपासूनच्या “ए ” ला क्षणभरापुरतं विसरून “से” म्हणणं, फारच अवघड होतं. मग थोड्या दिवसात आलं ते 日本語初歩 (निहोन्गो शोहो) नावाचं पाठ्यपुस्तक. त्यामुळे लेखन, वाचन आणि संभाषण अशा तीन पातळ्यांवर भाषा विकासाचे आमचे प्रयत्न सुरु झाले. शुभ प्रभात, शुभ रजनी या नेहमीच्या शुभेच्छांसोबतच घरातून बाहेर पडणं, परत येणं, जेवण सुरु करणं, संपवणं, दुकानात येणं इत्यादी अनेक गोष्टींसाठीचे नवनवे शुभेच्छासंदेश आमच्या शब्दकोशात भर टाकत होते. मराठी - हिंदी - इंग्लिश पेक्षा जाणवलेलं प्रमुख वेगळेपण म्हणजे अनेकवचनांचा अभाव. एक झाड पण की आणि अनेक झाडे पण कीच. इथंही इतक्या वर्षांपासून डोक्यात घट्ट बसलेल्या की म्हणजे किल्ली या समीकरणाला छेद द्यावा लागत होता. पण वचन एकच असलं तरी अनेक वस्तू झाल्या की मोजाव्या लागणारच. आजवर या चराचर सृष्टीतील यावज्जीव सजीव - निर्जीवांना मोजण्यासाठी १, २, ... या एकाच अंक - तागडीत तोलायची सवय होती. पण जपानीत तर माणूस, प्राणी, पक्षी, लांब वस्तू, इमारती, यंत्रे, सपाट वस्तू अशा अनेक तऱ्हेच्या वर्गवारींसाठी स्वतंत्र मोजणी तक्ते. ते सारे लक्षात ठेवून सुयोग्य जागी वापरताना नाकी नऊ येत. मग आले विशेषण – क्रियापदांचे प्रत्येकी २ आणि ३ प्रकार. पुढे पुढे जशी मोठी वाक्यं आली तशी भारतीय भाषा आणि जपानीतली समानता दिसायला लागली. त्यामुळेच, जपानी वाक्यं इंग्लिश पेक्षा मराठी -हिंदीत अनुवादित करणं सोपं जात असे. शिवाय, करून ठेव, बघून घे, करून बघ अशी दुहेरी क्रियापदंही जपानीत आहेत.

अशा अनेक गोष्टींचा वेध घेत घेतच वर्ष संपलं. सध्या इथेच थांबते. उरलेल्या वैशिष्ट्यांवर परत कधीतरी बोलूयात. じゃまた( ज्या -माता) .

Wednesday, March 14, 2012

अकिरा योशिझावा आणि कागदी दुनिया

आज सकाळी google doodle नं लक्ष वेधून घेतलं - कागदी google आणि फुलपाखरे... आणि मग कळलं की आज अकिरा योशिझावाची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही आहे म्हणून...
कोण होता हा अकिरा योशिझावा? पारंपारिक जपानी कला ओरिगामीला जगण्याचं साधन बनवण्याचे धाडस सर्वप्रथम केलं ते यानंच. ९४ वर्षांच्या आपल्या आयुष्यात तब्बल ५०,००० हून अधिक ओरिगामीच्या कलाकृती बनवणारा हा अवलिया. कंपनीत भूमिती शिकवण्यासाठी त्यानं ओरिगामीचा वापर सुरु केला आणि मग त्याच्या लहानपणापासून जोपासलेल्या छंदाला खत-पाणी मिळालं. या ध्यासापायी पुढं त्यानं कंपनीतली नोकरीदेखील सोडली. १९३७ साली हे नक्कीच खूप धाडसाचं होतं. साहजिकच सुमारे१५ वर्षं गरिबीत दारोदार भटकत घालवावी लागली. तरीदेखील निराश न होता १९५४ साली त्यानं Atarashi Origami Geijutsu (नवी ओरिगामी कला) या नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकातील घड्यांसाठीची notations आजही प्रमाण म्हणून वापरली जातात. याच वर्षी, म्हणजे त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षी, तोक्यो मध्ये International Origami Centre ची स्थापनाही त्यानं केली. पुस्तकामुळे त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली होती. पण सच्चा कलाकार असलेल्या अकिराने आपल्या कलाकृती कधीही विकल्या नाहीत. त्या इतरांना भेट देण्यात किंवा प्रदर्शनासाठी देण्यातच त्याला आनंद मिळत असे.
ओरिगामीच्या थोड्याश्या ओबडधोबड कलाकृतींना अधिक गोलाई देऊन सुबक करण्यासाठी अकिराने "wet folding " या नवीन तंत्राचा वापर सुरु केला. कागद थोडासा ओलसर करण्याच्या या तंत्रानं ओरिगामी कलाकृतींमध्ये 3-d परिणामही अधिक उत्तमरीत्या साधला जाऊ लागला.
तर असा हा महान कलाकार आज "google doodle" च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या घराघरात पोचलाय.

Monday, February 27, 2012

Rat's Paw /पिपांत मेले ओल्या उंदीर


It was an afternoon, in August. We (me and deep) entered our office to be welcomed by a messed up drawer. There was someone, who was sharing not only our office space, but our food as well. And then, the hunt began…
The claws indicated that it was some kind of rodent. But then, we hadn’t kept the drawer open. Was there someone from “Ratatouille”, who was smart enough to open the heavy drawer? Surprisingly, it was true. Its way of entering the drawer by climbing from the lower section of the table and then pushing the drawer from inside was really astounding. But then, we bipedals don’t like to get defeated by some petty quadrupeds. And hence, we blocked its way by locking the table drawer. 
But this new roommate of ours was not to be deterred by these small oppositions. In fact, it lodged its protest by routinely dirtying our floor and the table tops with its paws.
It kept visiting our room, though he no longer had access to the delicious food items. We desperately wanted to have a glimpse of it, but what we found were just various evidences of its existence. And now, the story seems to have ended. Last Saturday, we caught a sight of it in the water tank. It may have fallen down in it while jumping from its edge and couldn’t come up. Hope, others from its clan don’t take up its incomplete job of fighting against us…. RIP "the uninvited guest"…
आज मराठी भाषा दिन ! आणि सकाळी सकाळी हे उंदराचे दर्शन. त्यामुळे, साहजिकच मर्ढेकरांच्या कवितेची आठवण झाली.

पिपांत मेले ओल्या उंदीर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;
मधाळ पोळे;

ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदीर न्हाले! न्हाले!

- बाळ सीताराम मर्ढेकर

सर्व वाचकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Saturday, December 31, 2011

गोष्ट खासा-जीझोची - जपानी नववर्षाची


जपानच्या एका डोंगरावर एक आजी - आजोबा राहत होते.  खासा (वेताच्या टोप्या) विकून ते आपला उदरनिर्वाह करीत. नवीन वर्ष सुरु होण्याच्या आदल्या दिवशी घडलेली ही गोष्ट. आजी आजोबांना म्हणाली, "उद्या नवीन वर्ष सुरु होणार. केक बनवायला सामान आणायला हवं." आजोबा म्हणाले, "तू काळजी करू नकोस. मी बाजारात जाऊन  खासा  विकतो आणि मिळालेल्या पैशातून सामान घेऊन येतो."

पाच खासा घेऊन आजोबा बाजारात गेले. दिवसभर त्यांनी खूप प्रयत्न केला; पण त्या खासा कोणी घेतल्याच नाहीत. निराश होऊन आजोबा परतीच्या वाटेला लागले. थंडी वाढू लागली होती. हिमवृष्टीही सुरु झाली. अचानक आजोबांचा लक्ष एका जीझोकडे गेलं. गावाचं आणि विशेषतः लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी असे जीझो  (पुतळे) असत. बघता बघता बर्फाने झाकले गेलेले सहा जीझो आजोबांना दिसले. आजोबांनी हात लावून पाहिलं. बिचारे जीझो चांगलेच गारठले होते. आजोबांना त्यांची दया आली. आपल्यासोबतच्या खासा काढून त्यांनी जीझोंना घालायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडे पाचच खासा होत्या आणि जीझो तर सहा होते. इतक्यात आजोबांना काही तरी सुचलं. ते सहाव्या जीझोकडे गेले आणि आपल्या डोक्यावरची खासा काढून त्याला घालत म्हणाले, "ही काही तितकी नवी नाही, पण तरी थोडी थंडी तर नक्कीच कमी करेल ती." आणि समाधानाने आजोबा घरी परतले.
थंडीत कुडकुडणाऱ्या, बर्फानं माखलेल्या आजोबांना पाहून आजी म्हणाली, "अरे तुमची खासा कुठं गेली? ". आजोबांनी सारी गोष्ट आजीला सांगितली. केकचं सामान आणता आलं नाही म्हणून त्यांना वाईटही वाटत होतं. पण आजी त्यांना म्हणाली, "छानच केलंत तुम्ही. केक नाही केला तरी काही बिघडणार नाही." आणि दोघंही आनंदानं झोपी गेले.
रात्री अचानक मोठ्या आवाजानं आजी - आजोबा जागे झाले. कोणीतरी बर्फात चालत, गात येत असल्याचा आवाज येत होता.  आजी - आजोबा दोघे उठून बाहेर आले. जसजसं ते बाहेर येऊ लागले, तसे गाण्याचे बोल स्पष्टपणे ऐकू येऊ लागले.
"A kind old man walking in the snow
Gave all his hats to the stone Jizo.
So we bring him gifts with a yo-heave-ho!"
दार उघडून पाहतात तो काय, दारात सुंदरसा केक ठेवलेला होता आणि दूरवर ते खासा घातलेले सहा जीझो बर्फात आपल्या पाऊलखुणा ठेवत जात असलेले त्यांना दिसले.
मग काय मंडळी, कशी वाटली गोष्ट. एकूण काय तर जपान असो वा भारत वा आणखी कुठला देश ... सर्वांवर प्रेम करा आणि गरजूंना मदत  करा, असाच संदेश या साऱ्या लोककथा देतात.

Friday, November 4, 2011

दोन पावलांच्या अंतरावर दोन स्मारकं....



आज ४ नोव्हेंबर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा १६६ वा जन्मदिन... ब्रिटीश सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा हा प्रयत्न लौकिकार्थानं फारसा यशस्वी झाला नसला तरी ब्रिटीशांना दहशत बसवण्यात फडके निश्चितपणे यशस्वी ठरले.

प्रसारमाध्यमे फारशी नसणाऱ्या १९ व्या शतकात देखील त्यांची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती. त्यामुळेच बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या आनंदमठ मध्येही फडक्यांचे कारनामे वाचण्यास मिळतात.

पकडले गेल्यानंतरही एडनच्या तुरुंगाचा दरवाजा उचकटून पळून जाण्याचा पराक्रम गाजवणारा 
 हा क्रांतिकारक. त्यांच्या या अचाट शक्तीचं मला लहानपणापासूनच आश्चर्य वाटत आलंय. पण नुकताच त्यांच्या शिरढोण येथील स्मारकाला भेट देण्याचायोग आला आणि मग त्यांच्या घरातला पाट पाहून त्यांची शरीरयष्टी किती भरभक्कम असेल याचा अंदाज आला. जोग परिवारानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं अत्यंत उत्तमरीत्या घडवलेलं आणि जपलेलं हे स्मारक. फडक्यांच्या घरातील रवी, त्यांच्या आजोबांनी त्यांच्यासाठी खास बनवलेली बोकडाची गाडी अशा काही वस्तू आणि चित्र -शिल्पांनी युक्त असं हे स्मारक पाहून आम्ही धन्य झालो.

पण तिथून बाहेर पडताच समोर आलं ते फडक्यांचं घर... पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणारी ही वास्तू .
"जो कोणी या वास्तूत फेरफार करील त्यास ५००० रु. दंड / ३ महिने कारावास" या स्वत:च्याच सूचनेला घाबरून बहुधा गवत नि कचरा काढण्याचं धाडस होत नसावं किंवा आत जाऊन कुणी काही फेरफार करू नये म्हणून वाटेवर गवत वाढवलेलं असावं....

दोन पावलांच्या अंतरावर दोन टोकाच्या स्थितीतली ही स्मारकं पाहून मनात शिरढोणवासियांबद्दल कृतज्ञता आणि सरकारी अनास्थेबद्दल विषण्णता दाटून आली....

Tuesday, October 11, 2011

कोजागरीचा पाऊस

वाटलंही नव्हतं की एकाच पावसाळ्यात दोनदोनदा पावसावर post लिहावी लागेल म्हणून. पावसाच्या स्वागताला त्याच्या आठवणींची post लिहिली आणि आता आजच्या आठवणीची त्या पर्जन्यस्मृतीकोशात भर पडणार असं दिसतंय … आजकाल पावसाला माणसाशी मैत्री फारच आवडायला लागलीये असं दिसतंय …. मागच्या वर्षीही त्याचा पाय निघता निघत नव्हता… अगदी दिवाळीत फराळालाही तो आपल्यासोबत होताच … यंदाही एप्रिलमध्येच सुरु होऊनसुद्धा अजूनही तो रेंगाळतोय …

ऑक्टोबर महिना सुरु झालाय हे खरं गेल्या २ - ३ दिवसात चांगलंच जाणवायला लागलं होतं. ऑक्टोबर heat च्या प्रभावामुळे विद्यापीठातल्या रात्रीसुद्धा बोचऱ्या थंडीऐवजी घामेजलेल्या व्हायला लागलेल्या . आजचीही दुपार काही वेगळी नव्हती . वर्तमानपत्रात मात्र मॉन्सून परतला तरी आणखी २ - ३ दिवस पाऊस पडणार असं वेधशाळावाल्यांचं भाकीत आलेलं… पण अर्थात हवामान अंदाजात पाऊस पडणार असं सांगितलं की खुशाल छत्र्या / रेनकोट घरी ठेवायचे असं मानणारे आपण भारतीय . त्यामुळे पाऊस बिऊस येईल असं काही कुणाच्या गावीही नव्हतं …पण साऱ्यांना तोंडघशी पाडणार नाही तो पाऊस कसला …. गेल्या तीन वर्षात पुणेरी माणसांपेक्षाही पुणेरी पावसाचा विचित्र स्वभाव जास्त अनुभवायला मिळालाय . बहुदा शिवाजीमहाराजांच्या संगतीत त्यानं गनिमीकावा शिकलेला असावा . त्यामुळंच शत्रूला गाफील ठेवून मोक्याच्या क्षणी त्याच्यावर आक्रमण करून त्याला खिंडीत कसं गाठायचं हे त्याला पक्कं ठाऊक झालंय…

संध्याकाळी ४ ते ५ तर तो मनसोक्त बरसलाच , पण त्यानं पोट भरलं नाही म्हणून की काय … त्याची ७ च्या सुमारास सुरु झालेली 2nd inning अजूनही सुरूच आहे . आणि शिवाय त्याला साथ विजेची . खरं तर दोन्ही विजांची … मानवनिर्मित वीज जणू आपला पाठिंबा देण्यासाठी संपावर गेलीये तर त्याची सखी वीज त्याच्या इतक्याच जोरात प्रकट होऊन त्याला इमाने - इतबारे साथ देतीये . मेणबत्तीही आता संपत आलीये …. वीज चमकल्यानं क्षण्भरापुरती उजळून निघणारी झाडं , पाठोपाठ बहिरं करून सोडणारा ढगांचा गडगडाट , पावसाचा आणि वाऱ्याचा प्रचंड आवाज , हे सगळं अंधाऱ्या खोलीच्या खिडकीतून एकट्यानं अनुभवताना अगदी चित्रपटात किंवा कादंबरीत प्रवेश केल्यासारखं वाटतंय ….

आत्ताच आईच्या फोनमुळे मला असं कळलंय , की आज कोजागरी आहे . इतकावेळ ते मला माहीतही नव्हतं . चंद्र दिसला असता तर कदाचित आठवण झाली असती …. पण नभ मेघांनी आक्रमिल्यामुळे, शरदाच्या पिठूर चांदण्याऐवजी laptop च्याच प्रकाशात समाधान मानतीये. अनेकांच्या दुधाच्या आनंदावर विरजण घालायचं ठरवलेलं दिसतंय या पावसानं . hostel पासून चालायच्या अंतरात कुठंच आटवलेलं दूध न मिळाल्यानं रात्री बारा वाजता icecream खाऊन कोजागरी साजरी केल्याची आठवण आत्ताच एका मित्रानं फोनवर सांगितली , पण आज तर सगळ्याच नियोजित / उत्स्फूर्त कार्यक्रमांवर पावसाचं पाणी फिरणार असं वाटतंय … किंवा कदाचित यंदा त्यालाही लक्ष्मीला भेटायची इच्छा झाली असावी … म्हणून मग आज रात्री १२ पर्यंत कार्यरत राहून ‘को जागर्ति ?’ ला उत्तर द्यायचं ठरवलं असावं त्यानं …विजयादशमीला कुबेरानं रघुराजाच्या राज्यात पाडलेला सुवर्णमुद्रांचा पाऊस किंवा आजकाल माणसांच्या तोंडी असणारा पैशांचा पाऊस ह्या काय भानगडी आहेत ते बहुतेक लक्ष्मीकडून जाणून घ्यायचं असावं त्याला ….

Saturday, July 2, 2011

पाहुणा पाऊस

पाऊस! सगळ्याच लेखक - कवींचा आवडता विषय... मीही त्याला अपवाद नाही. पावसाच्या आठवणींचा जणू एक खजिनाच आपल्या पोतडीत असतो.

माझ्या आठवणीतला पहिला मुसळधार पाऊस पडला तेव्हा मी चार वर्षांची होते. माझ्या तर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाणी आलेलं. त्यापूर्वी एकदा म्हणे आमची आख्खी बस पाण्यात वाहून जाता जाता वाचलेली असं आई-बाबा सांगतात. पण तेव्हा मी बहुदा फारच छोटी होते... नंतर तर नवा रेनकोट/ छत्री वापरायला मिळावं म्हणून पाऊस यावा असं वाटायचं...

नंतरचा आठवणारा पाऊस मी पाचवीत असतानाचा. आम्ही मैत्रिणी शाळेतून घरी येत होतो. वाटेत एक ओढा लागायचा. त्या पुलाच्या वरून पाणी वाहायला लागलेलं. तशा परिस्थितीत त्याच पुलावरून नाचत - उड्या मारत आम्ही घरी आलो. कारण रस्ता दिसत नाहीये तर आपण वाहून जाऊ शकू हा विचार तेव्हा डोक्यातच आला नव्हता. एक नवा thrilling experience एवढंच आमच्या लेखी त्याचं स्थान होतं.  एक दुसरा रस्ता पण होता, पण जरासा दूरचा. त्यामुळे घरी गेल्या गेल्या शिव्यांच्या पावसात भिजावं लागलं...

केवळ बाहेरच हा पाऊस भिजवतो असं नाही हं, आजवर दोन-तीनदा तर आमच्या घरातही त्यानं प्रवेश केलाय. एकदा खूप लहानपणी... आमचं घर एका उतरणीच्या पायथ्याशी होतं. त्यामुळे पाण्याचे लोंढेच्या लोंढे  घरात घुसले. अचानक झालेल्या या माऱ्यानं आम्ही गडबडलो. मला पलंगावर बसवून आईनं पाणी उपसायला सुरुवात केली.  रात्री ९ ते २-२.३०  हाच कार्यक्रम चालला होता. नंतर तर एका घरात दरवाजाखालच्या फटीत एक छोटासा धबधबाच तयार झाला होता. आणि मग घर म्हणजे त्या धबधब्यानं निर्माण झालेला जलाशय. मग दुसऱ्या दिवशीच त्या फटीचा बंदोबस्त केला गेला... त्या वर्षीचा पावसाळा मग निर्विघ्नपणे पार पडला. पुढल्या वर्षी मी एका खोलीत अभ्यासाला बसले होते. बाहेर पाऊस सुरु होता. पण यंदा तर काही कोणती फट मोकळी नाही अशा गोड गैरसमजात मी होते. थोड्या वेळानं फोन वाजला म्हणून मी बाहेरच्या खोलीत आले, तर "अवघा जीवनमय  संसार " अशी परिस्थिती होती.

आता मात्र बऱ्याच दिवसात हा पाहुणा आमच्या घरी आलेला नाही. आता आमची गाठ बाहेरच पडते आणि गप्पा होतात त्याही  खिडकीतूनच.... 


Thursday, May 26, 2011

गंधर्वयुग

काल बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा योग आला. अर्थातच it was worth it…. आमच्या पिढीला गन्धर्वयुगाच्या सुवर्णकाळाची सफर घडवून आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे ….

सकाळ मधल्या सुबोध भावेंच्या लेखनातून चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झाली होतीच; पण ती उत्सुकता शमवतानाच बालगन्धर्वांविषयी अधिक माहिती घ्यायलाही उद्युक्त करण्याचं काम या चित्रपटानं केलंय . एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी झटलं की कसा उत्तम कलाविष्कार साकार होतो , याचं उदाहरण म्हणून या कलाकृतीकडं पाहता येईल …

सुबोध भावेंचा राजस बालगंधर्व मनात घर करतोच , पण त्याचबरोबर “मामा , गंधर्व म्हणजे काय रे ?”, असं निरागसपणे विचारणारा अथर्व कर्वेही आपल्या छोट्याश्या भूमिकेत ठसा उमटवून जातो . बालगंधर्वांची रसिकता, विनम्रता , कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती , उत्कृष्टतेचा ध्यास , अनेकानेक आघात पचवण्याचं धैर्य , रसिकांवरची श्रद्धा , तत्त्वनिष्ठा आणि “इदं न मम ” अशी निरासक्त वृत्ती , अशा बहुविध पैलूंचं इतक्या अल्प कालावधीत प्रत्ययकारी दर्शन घडवण्याचं शिवधनुष्य नितीन देसाईंच्या नेतृत्त्वाखाली या साऱ्या मंडळींनी अतिशय उत्तमरीत्या पेललंय . पण त्याचबरोबर त्यांच्या अव्यवहारीपणा सारख्या काही उण्या बाजूही अगदी सहजगत्या समोर आणल्यायेत . आणि हे सगळं केलंय ते कुठंही “judgmental ” न होता … कारण , चित्रपटात म्हटल्याप्रमाणं गंधर्वांच्या आयुष्याला लौकिक बंधनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणंही निष्फळ आहे …. . शिवाय , सहकाऱ्यांचं प्रेम आणि कळकळ, रसिकांचं प्रेम आणि त्यातूनच उमटणारी दानशूरता , सहचारिणीची सोशिकता या गोष्टी झाकोळल्या जाणार नाहीत याचीही पुरेपूर दक्षता दिग्दर्शकानं घेतलीये . 

मुलीच्या मृत्यूनंतर डोळ्यात आलेलं पाणी क्षणार्धात टिपून भूमिका रंगवणारे बालगंधर्व आपल्या डोळ्यात अश्रू उभे करतात , तर बोलपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी होणारी एका सच्च्या रंगकर्मीची घुसमट आपल्यालाही अस्वस्थ करून सोडते . आणि हे सगळं पाहिलं की पटतं – “खरंच, आयुष्य हे तर एक नाटकच. त्याचे प्रवेश “त्यानं” आधीच लिहून ठेवलेत . फक्त आपल्या वाटेला आलेली भूमिका उत्तमरीत्या पार पाडणं हेच आपलं कर्तव्य”.


PS: १. आनंद भाटेंचा देखील विशेषत्त्वाने उल्लेख करायला हवा.
      २. आता कुठूनतरी “धर्मात्मा” मिळवायला हवा ….


Friday, April 1, 2011

केल्याने देशाटन - ३ ...


आजपर्यंत बोललो, ते आदर्शांबद्दल ... आज थोडं आपल्यासारख्यांकडून घेता येणाऱ्या गोष्टींबद्दल... 
गोव्यात जसा समुद्र पहिला, तशीच  आम्ही "मातृछाया " आणि "स्नेहमंदिर" या समाजमन्दिरांनाही भेट दिली. मातृछायातली निरागस मुलं आजही आठवतायत. स्नेहमन्दिरामधल्या आजी-आजोबांशी बोलताना जे समाधान मिळालं, ते अगदीच अवर्णनीय होतं. बा. भ. बोरकरांनी एका कवितेत म्हटलंय- 
" देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके , चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे " 
अशी अनेक तृप्त जीवनं तिथे पाहायला मिळाली. त्यांच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी ऐकताना जीवनाचे अनेक पैलू नव्यानं उलगडले गेले.


असंच, जीवनाचं एक नवं रूप बघायला मिळालं, ते जव्हार-देवबांधच्या आदिवासी वस्त्यांवर. जेव्हा  सूर्यमाळच्या पठारावर आमची गाडी थांबली, तेव्हा एस. टी. बघायला गोळा झालेली मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं अप्रूप अजूनही डोळ्यांपुढे येतंय. एस. टी. बघून त्यांना झालेला आनंद पाहिला आणि मग आपण किती सुखी आयुष्य जगतो याचा प्रत्यय आला. "मला लाल डब्यानं जायला नाही आवडत, व्होल्वोनी जाऊ किंवा आपली कार नेऊ ", अशी फर्माईश करणाऱ्यांना, लाल डब्यात बसणं तर सोडाच, पण लाल डबा बघायला मिळणंच, काहींसाठी इतकं महद्भाग्य ठरतं हे कळलं, तेव्हा मिळालेलं शहाणपण हे बाकी कोणत्याही शाळा-कॉलेजच्या शिक्षणानं आलं नसतं.
"I had the blues, as I had no shoes, 
until upon the street, I met a man who had no feet." 
अशाच प्रकारची काहीशी आमची परिस्थिती होती. पुस्तकात, वर्तमानपत्रात वाचलेलं 'कुपोषण', तिथल्या मुलांमध्ये प्रत्यक्षात पाहिलं आणि मग आपले जेवतानाचे नखरे कमी करायला हवेत, हे मनोमन पटलं. आजही पानात काही शिल्लक उरेल असं वाटत असतानाच, त्या मुलांचे चेहेरे आठवतात आणि मग आपोआपच नावडते पदार्थदेखील संपवले जातात. दुरून , उन्हात अनवाणी पायांनी पाण्याचे हंडे भरून घेऊन येणाऱ्या छोट्या छोट्या मुली पाहिल्या आणि पाण्याचंही जीवनमूल्य पटलं. अशा परिस्थितीत जगत  असतानाही त्यांनी आनंदानं केलेली नृत्यं पाहिली आणि मग जाणवलं की सुख-समाधान हे बाह्य परिस्थितीवर नव्हे तर मनस्थितीवर अवलंबून असतं.

आणि हो, हे सारं आपण ज्यांच्यासोबत अनुभवतो, त्या सहप्रवाशांकडूनही खूप काही शिकायला मिळतं बरं का... घरात आपल्या सख्ख्या बहीण-भावांशी भांडणारेही तिथे आपलं आवरून झालं की अगदी उत्साहात  एखाद्या छोट्या दोस्ताची bag भरून द्यायला मदत करतात.  मोठ्या ताई-दादांना काम करताना पाहून, "काकू मी नाश्त्याच्या प्लेट्स गोळा करू का ?", असं स्वत:हून विचारणारे मित्रही भेटतात.  आपल्यापेक्षा लहान असून देखील सहलीतल्या प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगू शकणारा एखादा मित्र आपल्यालाही अवांतर वाचनाला प्रवृत्त करतो. सहलीत मित्राच्या वाढदिवसासाठी दोन मिनिटात सुंदरशी रांगोळी काढणारी ताई किंवा रोज नवनवीन गाणी/स्तोत्रे सांगणारा दादा पाहिला की  आपणही एखादी कला जोपासली पाहिजे असं वाटायला लागतं. रात्री सगळ्यांच्या नंतर झोपून, सकाळी सगळ्यांच्या आधी उठणारे आणि तरीही दिवसभर सगळ्यांपेक्षा जास्त काम करणारे काका-काकू बघितले की - "मन उत्साही असेल तर शरीरही न थकता साथ देतं", हे पटतं, आणि मग हे सारं पाहिलं की आपल्याही नकळत बदल घडून येतात. 

"मला कोणीच माझ्या सामानाला हात लावलेलं आवडत नाही", असं म्हणणारी मुलगीच पुढच्या सहलीत स्वत:हून आपल्याकडचं जास्तीचं पांघरूण कोणाला हवंय का असं विचारते. यंदा आपण मला दोन ऐवजी एकच नवा ड्रेस घेऊन, उरलेले पैसे देवबांधच्या 'भाऊबीज निधी'ला पाठवूयात का, असं कोणीतरी आई-बाबांना सुचवतो. "काका, पुढची सहल कुठे जाणार ते सांगा, म्हणजे मी माहिती गोळा करून ठेवतो", असं कुणीतरी म्हणतं, तर "काकू, या वेळी रोज सकाळी सगळ्यांना बिस्किटे देण्याचं काम मी करणार हं", असंही कुणीतरी म्हणतं. 

हे सगळं घडतं याचं कारण - माणसाचं मन हे टीपकागदासारखं असतं. दिसतं ते टिपून घेणारं. म्हणूनच जर आपलं मन अधिकाधिक संवेदनशील बनवून, एक परिपूर्ण व्यक्ती बनायचं असेल, तर हा असा सहलीचा अनुभव हवाच...   

Saturday, March 26, 2011

केल्याने देशाटन -२ ...

'स्वामी' कादंबरीत माधवराव रमाबाईंना म्हणतात - "ओहोटीच्या वेळी मोकळ्या पडलेल्या किनाऱ्यावर जेव्हा समुद्र-खेकडे रांगोळ्या घालू लागतील, तेव्हा तुझा अभिमान पार धुऊन जाईल आणि तू कौतुकानं त्यांनी रेखाटलेल्या कलाकृती बघत राहशील. " असंच आपलं  खुजेपण आणि निसर्गाचं श्रेष्ठत्व पदोपदी जाणवत राहतं. अथांग सागर अंत:करणाची विशालता देतो, तर डोंगरावरून कोसळणारा धबधबा इतरांसाठी जीव झोकून द्यायला शिकवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीवेळेला सारखाच रंग धारण करणारा सूर्य "संपत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता " हे दाखवून देतो. शिंपल्यातून अचानक बाहेर येणारी गोगलगाय जशी दचकायला लावते, तसाच समुद्रात लाटेमुळे "पायाखालची वाळू सरकणे", या वाक्प्रचाराचा प्रत्यक्ष येणारा अनुभव हृदयाचा ठोका चुकवतो. 

 इतिहासाच्या माध्यमातून भेटणारी माणसंही असंच खूप काही शिकवून जातात. हिरकणी बुरुजावरून खाली डोकावून पाहिलं की आजही आपले डोळे फिरतात. मग अशा जागेवरून अंधारात, जंगलात उतरण्याचं धाडस करणाऱ्या हिरकणीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो. गड बांधण्याच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी बक्षीस देऊ केले असता, पायरीच्या दगडावर "सेवेचे ठायी तत्पर, हिराजी इंदूलकर ", असे लिहिण्याची परवानगी मागणारा हिराजी निरपेक्ष सेवेचा उत्तम आदर्श घालून देतो. "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" असं सांगणारा तानाजी मालुसरे राष्ट्रहित महत्वाचे असल्याचा संदेश देतो, तर राजे सुखरूप गडावर पोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत सिद्दी जौहर आणि यमराज दोघांनाही घोडखिंडीत थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे असीम कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण बनून राहतात. आणि हा असा  त्या त्या जागी जाऊन इतिहासाचा पुन:प्रत्यय घेण्याचा प्रयत्न केला की मग हे केवळ पुस्तकी दाखले न राहता, जीवनपथावर पदोपदी मार्गदर्शक ठरणारे प्रसंग बनतात. शिवाय पुस्तकातला इतिहास जणू सजीव झाल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.      
   
पण केवळ इतिहासातच चांगली माणसं होऊन गेलीत असं थोडंच आहे. आजही आपल्याभोवती अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांच्याकडून आपल्याला खूप शिकायला मिळू शकतं. अशाच काहींच्या भेटीचा योग सहलीच्या निमित्तानं येतो - मग ते आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ. अरविंद परांजपे असतील, वा आपल्या कथाकथनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे सु. ह. जोशी असतील. श्रोत्यांना आपलंसं करून घेणं, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सारखंच महत्त्व देणं, या अशांच्या वैशिष्ट्यांमुळे नकळत आपणही ते गुण उचलतो. आपलं पद, प्रतिष्ठा यांचा विचार न करता इतरांबरोबर समरस होऊन राहणारी माणसं सहलीत बघायला मिळतात. एकदा आम्ही कोकणातला एक कौलांचा कारखाना बघायला गेलो होतो. कारखाना बघताना एक काका  आम्हाला कारखान्याची माहिती देत होते. त्या कारखान्यात नोकरी करणाऱ्यांपैकीच  ते असावेत असा आमचा अंदाज होता. संपूर्ण कारखाना बघून झाल्यानंतर आम्हाला कळलं, की ते त्या कारखान्याचे मालक श्री. जोगळेकर होते. आता एवढ्या मोठ्या उद्योगाचा मालक दीड - दोन तास आपल्याशी गप्पा मारत फिरत होता, ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. तशीच गोष्ट महाबळेश्वरच्या श्री. आगरकरांची. त्यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रात आम्ही गेलो असता, मधमाश्यांच्या प्रकारांपासून ते मधाच्या प्रकारांपर्यंत साऱ्या प्रक्रियेची माहिती त्यांनी अतिशय साध्या शब्दांत आणि उत्साहानं दिली. ही अशी माणसं भेटली, की "विद्या विनयेन शोभते", या सुवचनाची सत्यता पटते. 

या थोरामोठ्या मंडळींप्रमाणेच, आजूबाजूची सामान्य माणसं आणि इतकंच नव्हे, तर आपली मित्रमंडळी देखील नकळतपणे खूप काही देऊन जातात. त्यांच्याबद्दल बोलूयात, पुढच्या भागात. 

Sunday, March 6, 2011

केल्याने देशाटन - १ ...

"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ. पण या ओळींची सत्यता अनुभवली ती मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या 'मातृभूमी दर्शन' उपक्रमातून. फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो - 
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."  
म्हणूनच प्रवास, त्यातही समवयस्कांच्या समूहासोबत केलेला प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे.

अशा या नियोजनबद्ध सहलीचा सर्वात प्रमुख फायदा म्हणजे त्यातून लागणारी स्वयंशिस्त. एरवी घरात आईच्या प्रत्येक हाकेला, दोन मिनिटांत उठतो असं उत्तर देत उठायला अर्धा-अर्धा तास लावणारेही गाडी निघून जाईल या भीतीनं कोणीही हाक न मारताच साडेपाचलाच उठून बसतात. शिवाय उठल्यावर अंथरुणात रेंगाळत न बसता पटकन आवरायला सुरुवात करणं, अंघोळ लवकर उरकणं, या सवयी इथंच पहिल्यांदा जडतात. आपलं सर्व सामान रोजच्या रोज जागच्या जागी ठेवणं, वस्तू सांभाळून न हरवता वापरणं या छोट्या छोट्या सवयी पुढे खूप उपयोगी पडतात.

सहलीतनं अंगी बाणणारा आणखी एक गुण म्हणजे स्वावलंबन. आजच्या हम दो - हमारे दो / एक च्या  जमान्यात, शाळेत जाताना डबा- waterbag भरण्यापासून ते बुटाची लेस बांधून देण्यापर्यंत आई- बाबा मदतीला असतात.  त्यामुळे जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून ठेवणं, आपल्या अंथरूण-पांघरुणाची घडी घालणं, या गोष्टीसुद्धा अनेकांना अवघड जातात. पुढच्या आयुष्यात होस्टेलवर राहायचं झालं की याच सवयी उपयोगी पडतात.

एवढंच नाही, तर बिना बोर्नविटाचे दूध पिणं, नावडती भाजी कुरकुर न करता खाणं, यासारख्या गोष्टी शिकायला तर सहलीशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तीन तास सिंहगड चढून, फिरून कडकडून भूक लागली की मग पानातली कोणतीही भाजी अगदी अमृतासारखी गोड लागते. शिवाय मित्र-मैत्रिणींच्या गप्पांची जोड कोणत्याही पदार्थाची चव अधिकच रुचकर बनवते. त्यामुळेच साधी ग्लुकोजची  बिस्कीटेसुद्धा  आवडीनं खाल्ली जातात. अनेक नवनवे पदार्थ खायला मिळाल्यानं आपल्या खाद्यज्ञानात  भरपूरच भर पडते. रंगामुळे सुरुवातीला विचित्र वाटणारी सोलकढी किंवा नाचणीची भाकरी, यांनादेखील आपल्या मनात आवडीची जागा मिळते. मालवणी खाजा, कर्नाटकातला सेट डोसा असे वेगवेगळ्या प्रांतातले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मनात कायमचे घर करून राहतात. रुमाली रोटी सारखा प्रकार अनेकांनी खाल्लाही नसेल, पण आम्हाला सहलीत तो खायला तर मिळालाच, पण त्याचबरोबर हवेत वरचेवर झेलत सुन्दरशी रुमाली रोटी बनवण्याचं बल्लावाचार्यांचं कौशल्यही  तिथं पाहायला मिळालं.

हे झालं खाद्यपदार्थांचं. पण त्याचबरोबर जी फळं आपण नेहमी खातो, जे जॅम वापरतो , त्या फळांची झाडं, फळप्रक्रिया केंद्रं बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातल्या नारळी-पोफळींच्या बागांची वर्णनं, नेहमीच पुस्तकात वाचलेली असतात. फळाबाहेर बी असणारा एकमेव झाड म्हणजे काजू हे सामान्यज्ञानाच्या पुस्तकात असतं. ते बघायला मिळतं, ते कोकणच्या सहलीतच. करवंदांच्या जाळीत हात घालून करवंद तोडण्यात वेगळीच मजा असते. सागरगोटेसुद्धा झाडाला लागतात हे मला तर सहलीत गेल्यावरच कळलं. सिंधुदुर्ग किल्ल्यातलं फांदी असलेलं नारळाचं झाड, समुद्रात असूनसुद्धा गोड पाणी देणाऱ्या दूध, दही, साखर बाव या विहिरी अजूनही जशाच्या तशा आठवतात. रायगडावरून पहाटे पाहिलेलं इंद्रधनुष्य, धुक्यात लपेटलेला सह्याद्री पर्वत आणि हे सगळं बोचऱ्या थंडीत अनुभवताना मध्येच झालेला हलक्या सरींचा शिडकावा आठवला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात.

हे सगळं झालं निसर्गानं दर्शन घडवलेल्या दृश्यांबद्दल. पण हा निसर्ग निर्जीव नाहीये. तो आपल्याला खूप काही शिकवतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू....