Friday, December 14, 2012

जपानी (日本語) शिकताना - 3


हिसाशीबुरी  दा ना (खूप दिवस झालेत ना आपण भेटून ..). आजच्या भागात एका भाषेत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलायला गेलं  की  कशा गमती होतात ते बघूयात .

याचं अगदी क्लासिक उदाहरण आमच्या भावना सेन्सेई नेहमी सांगतात. एकदा एका मुलाला "काल क्लासला का आला नाहीस? " असं  विचारल्यावर "मे गा किमाशीता (शब्दश: भाषांतर: डोळे आले होते.)" असं  उत्तर मिळालं . आता सेन्सेई पण मराठीत विचार करू शकत होत्या म्हणून ठीक. पण एखाद्या जपान्यानी हे उत्तर ऐकलं  कि तो बिचारा सॉलिड गोंधळणार हे काय प्रकरण आहे म्हणून....

 आणखी एक उदाहरण त्यांनीच सांगितलेलं... एकदा जपानमधल्या एका कंपनीत मीटिंग सुरु होती.   मीटिंग बरीच लांबल्याने थोडा ब्रेक घ्यावा असं  ठरलं.  भारतीय मंडळी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये बसून पुढचा अजेंडा ठरवत होती. तितक्यात एका जपानी माणसाचा फोने आला. ही सारी कॅन्टीन मध्येच आहेत हे कळल्यावर तो जपानी माणूस म्हणाला, "We will also go". हे ऐकून भारतीय माणूस वैतागला. आपण ह्यांना उशीर होऊ नये म्हणून बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जेवतोय आणि आता हे कुठे निघालेत..शेवटी जेव्हा दुभाष्या मध्ये पडला तेव्हा कळलं की  तो जपानी माणूस प्रत्यक्षात "आम्ही कॅन्टीनमध्ये येतोय", असंच  सांगत होता. पण जपानीत आपली आहे ती जागा सोडणं म्हणजे "जाणं " असल्यामुळे त्यांनी शब्दश: भाषांतर करून "We will come" च्या ऐवजी "We will go", असा शब्दप्रयोग केला. सुदैवानं, दुभाष्याला हे बारकावे माहित होते म्हणून ठीक... 

कालही वर्गात अशीच मजा झाली. एखाद्या गोष्टीचं  कारण कसं  सांगायचं  तो वाक्याचा प्रकार आम्ही शिकत होतो. उदाहरणादाखल प्रत्येकानी एकेक वाक्य बनवा असं सेन्सेईनी सांगितलं . माझ्या एका मैत्रिणीनी "काल लग्नाला गेल्यामुळे मी क्लासला आले नव्हते" असं वाक्य बनवायचं ठरवलं. आता मराठीत स्वत:चं  असो की  दुसऱ्याचं, लग्न ते लग्नच. पण जपानीत लग्न समारंभाला वेगळा शब्द आहे. त्यामुळे "काल मी लग्नाला गेले होते" याचं  शब्दश: भाषांतर केलं की "काल माझं  लग्न होतं", असा अर्थ निघतो. साहजिकच तिचं वाक्य ऐकताना हा फरक माहित असणाऱ्यांची हसून पुरेवाट झाली.  

परवा असाच एक घोळ मी पण केला. "जिंको" म्हणजे Population, असंच लक्षात असल्यामुळे bacteria ची जिंको असा शब्दप्रयोग मी वापरला. आता खरं  तर जिंको म्हणजे लोकसंख्या. त्यामुळे मी नक्की bacteriaच्या संख्येबद्दल बोलतीये की माणसांच्या हे न कळल्यामुळे समोरची जपानी मुलगी पूर्णच गोंधळली आणि मला हा प्रकार कळलाच नाही. नंतर एका मैत्रिणीने जिंकोतला जीन म्हणजे माणूस हे लक्षात आणून दिल्यावर माझी ट्यूब पेटली. शब्द वापरण्यापूर्वी कांजी डोळ्यापुढे आणणं  सेन्सेईना का गरजेचं  वाटतं ते मला पहिल्यांदा इतक्या प्रकर्षाने  जाणवलं.  

असंच आणखी एकदा आम्ही काही वाक्य बनवत होतो. माझ्या मैत्रिणीनी "जखम झाली की रक्त येतं " असं  वाक्य बनवलं. नेहमीप्रमाणेच वाक्य आधी मराठीत बनवून नंतर जपानीत भाषांतर केलं आणि मग झाली कीपरत गडबड. जपानीत आतून बाहेर यायला वेगळा शब्द आहे. आणि तो न वापरल्यामुळे रक्त असं समोरून पळत पळत भेटायला  येतंय असं दृश्य डोळ्यापुढे आलं  आणि आम्ही पोट धरून हसायला लागलो.

पूर्वी एका लेखात मराठी पुस्तकं इंग्रजीत भाषांतरित करताना "जेवायला पाने घेतली", "लोक तमाशा बघत होते" अशा वाक्प्रचारांचे भाषांतर करताना विशेष काळजी घ्यावी लागते हे वाचला होतं . आता दिवसेंदिवस त्याचा प्रत्यय यायला लागलाय...

6 comments:

  1. Hi Akanksha!

    nice post, infact all 3 r good. I wanted to learn Japanies. Could you pls let me know how, where, when about learning japanies. if possible drop me a mail on anaghaapte95@gmail.com.

    ReplyDelete
  2. खरच खुसखुशीत पोस्ट आहे :) 'रक्त असं समोरून पळत पळत भेटायला येतंय' या वाक्यावर मीही पोट धरधरून हसत सुटलेले.. मस्त!!

    ReplyDelete