Tuesday, October 11, 2011

कोजागरीचा पाऊस

वाटलंही नव्हतं की एकाच पावसाळ्यात दोनदोनदा पावसावर post लिहावी लागेल म्हणून. पावसाच्या स्वागताला त्याच्या आठवणींची post लिहिली आणि आता आजच्या आठवणीची त्या पर्जन्यस्मृतीकोशात भर पडणार असं दिसतंय … आजकाल पावसाला माणसाशी मैत्री फारच आवडायला लागलीये असं दिसतंय …. मागच्या वर्षीही त्याचा पाय निघता निघत नव्हता… अगदी दिवाळीत फराळालाही तो आपल्यासोबत होताच … यंदाही एप्रिलमध्येच सुरु होऊनसुद्धा अजूनही तो रेंगाळतोय …

ऑक्टोबर महिना सुरु झालाय हे खरं गेल्या २ - ३ दिवसात चांगलंच जाणवायला लागलं होतं. ऑक्टोबर heat च्या प्रभावामुळे विद्यापीठातल्या रात्रीसुद्धा बोचऱ्या थंडीऐवजी घामेजलेल्या व्हायला लागलेल्या . आजचीही दुपार काही वेगळी नव्हती . वर्तमानपत्रात मात्र मॉन्सून परतला तरी आणखी २ - ३ दिवस पाऊस पडणार असं वेधशाळावाल्यांचं भाकीत आलेलं… पण अर्थात हवामान अंदाजात पाऊस पडणार असं सांगितलं की खुशाल छत्र्या / रेनकोट घरी ठेवायचे असं मानणारे आपण भारतीय . त्यामुळे पाऊस बिऊस येईल असं काही कुणाच्या गावीही नव्हतं …पण साऱ्यांना तोंडघशी पाडणार नाही तो पाऊस कसला …. गेल्या तीन वर्षात पुणेरी माणसांपेक्षाही पुणेरी पावसाचा विचित्र स्वभाव जास्त अनुभवायला मिळालाय . बहुदा शिवाजीमहाराजांच्या संगतीत त्यानं गनिमीकावा शिकलेला असावा . त्यामुळंच शत्रूला गाफील ठेवून मोक्याच्या क्षणी त्याच्यावर आक्रमण करून त्याला खिंडीत कसं गाठायचं हे त्याला पक्कं ठाऊक झालंय…

संध्याकाळी ४ ते ५ तर तो मनसोक्त बरसलाच , पण त्यानं पोट भरलं नाही म्हणून की काय … त्याची ७ च्या सुमारास सुरु झालेली 2nd inning अजूनही सुरूच आहे . आणि शिवाय त्याला साथ विजेची . खरं तर दोन्ही विजांची … मानवनिर्मित वीज जणू आपला पाठिंबा देण्यासाठी संपावर गेलीये तर त्याची सखी वीज त्याच्या इतक्याच जोरात प्रकट होऊन त्याला इमाने - इतबारे साथ देतीये . मेणबत्तीही आता संपत आलीये …. वीज चमकल्यानं क्षण्भरापुरती उजळून निघणारी झाडं , पाठोपाठ बहिरं करून सोडणारा ढगांचा गडगडाट , पावसाचा आणि वाऱ्याचा प्रचंड आवाज , हे सगळं अंधाऱ्या खोलीच्या खिडकीतून एकट्यानं अनुभवताना अगदी चित्रपटात किंवा कादंबरीत प्रवेश केल्यासारखं वाटतंय ….

आत्ताच आईच्या फोनमुळे मला असं कळलंय , की आज कोजागरी आहे . इतकावेळ ते मला माहीतही नव्हतं . चंद्र दिसला असता तर कदाचित आठवण झाली असती …. पण नभ मेघांनी आक्रमिल्यामुळे, शरदाच्या पिठूर चांदण्याऐवजी laptop च्याच प्रकाशात समाधान मानतीये. अनेकांच्या दुधाच्या आनंदावर विरजण घालायचं ठरवलेलं दिसतंय या पावसानं . hostel पासून चालायच्या अंतरात कुठंच आटवलेलं दूध न मिळाल्यानं रात्री बारा वाजता icecream खाऊन कोजागरी साजरी केल्याची आठवण आत्ताच एका मित्रानं फोनवर सांगितली , पण आज तर सगळ्याच नियोजित / उत्स्फूर्त कार्यक्रमांवर पावसाचं पाणी फिरणार असं वाटतंय … किंवा कदाचित यंदा त्यालाही लक्ष्मीला भेटायची इच्छा झाली असावी … म्हणून मग आज रात्री १२ पर्यंत कार्यरत राहून ‘को जागर्ति ?’ ला उत्तर द्यायचं ठरवलं असावं त्यानं …विजयादशमीला कुबेरानं रघुराजाच्या राज्यात पाडलेला सुवर्णमुद्रांचा पाऊस किंवा आजकाल माणसांच्या तोंडी असणारा पैशांचा पाऊस ह्या काय भानगडी आहेत ते बहुतेक लक्ष्मीकडून जाणून घ्यायचं असावं त्याला ….

2 comments:

  1. अप्रतिम! गनिमीकावा आणि पावसालाही लक्ष्मीला भेटायची झालेली इच्छा ह्या दोन्ही कल्पना खूप छान आहेत :)

    खूप दिवसांनी ब्लोग लिहीलाहेस..त्यामुळेही जास्तच छान वाटत आहेच!

    ReplyDelete
  2. धन्यवाद मेघना, म्हणजे नियमित न लिहिण्याचेही काही फायदे असतात म्हणायचे...;)

    ReplyDelete