Saturday, July 2, 2011

पाहुणा पाऊस

पाऊस! सगळ्याच लेखक - कवींचा आवडता विषय... मीही त्याला अपवाद नाही. पावसाच्या आठवणींचा जणू एक खजिनाच आपल्या पोतडीत असतो.

माझ्या आठवणीतला पहिला मुसळधार पाऊस पडला तेव्हा मी चार वर्षांची होते. माझ्या तर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाणी आलेलं. त्यापूर्वी एकदा म्हणे आमची आख्खी बस पाण्यात वाहून जाता जाता वाचलेली असं आई-बाबा सांगतात. पण तेव्हा मी बहुदा फारच छोटी होते... नंतर तर नवा रेनकोट/ छत्री वापरायला मिळावं म्हणून पाऊस यावा असं वाटायचं...

नंतरचा आठवणारा पाऊस मी पाचवीत असतानाचा. आम्ही मैत्रिणी शाळेतून घरी येत होतो. वाटेत एक ओढा लागायचा. त्या पुलाच्या वरून पाणी वाहायला लागलेलं. तशा परिस्थितीत त्याच पुलावरून नाचत - उड्या मारत आम्ही घरी आलो. कारण रस्ता दिसत नाहीये तर आपण वाहून जाऊ शकू हा विचार तेव्हा डोक्यातच आला नव्हता. एक नवा thrilling experience एवढंच आमच्या लेखी त्याचं स्थान होतं.  एक दुसरा रस्ता पण होता, पण जरासा दूरचा. त्यामुळे घरी गेल्या गेल्या शिव्यांच्या पावसात भिजावं लागलं...

केवळ बाहेरच हा पाऊस भिजवतो असं नाही हं, आजवर दोन-तीनदा तर आमच्या घरातही त्यानं प्रवेश केलाय. एकदा खूप लहानपणी... आमचं घर एका उतरणीच्या पायथ्याशी होतं. त्यामुळे पाण्याचे लोंढेच्या लोंढे  घरात घुसले. अचानक झालेल्या या माऱ्यानं आम्ही गडबडलो. मला पलंगावर बसवून आईनं पाणी उपसायला सुरुवात केली.  रात्री ९ ते २-२.३०  हाच कार्यक्रम चालला होता. नंतर तर एका घरात दरवाजाखालच्या फटीत एक छोटासा धबधबाच तयार झाला होता. आणि मग घर म्हणजे त्या धबधब्यानं निर्माण झालेला जलाशय. मग दुसऱ्या दिवशीच त्या फटीचा बंदोबस्त केला गेला... त्या वर्षीचा पावसाळा मग निर्विघ्नपणे पार पडला. पुढल्या वर्षी मी एका खोलीत अभ्यासाला बसले होते. बाहेर पाऊस सुरु होता. पण यंदा तर काही कोणती फट मोकळी नाही अशा गोड गैरसमजात मी होते. थोड्या वेळानं फोन वाजला म्हणून मी बाहेरच्या खोलीत आले, तर "अवघा जीवनमय  संसार " अशी परिस्थिती होती.

आता मात्र बऱ्याच दिवसात हा पाहुणा आमच्या घरी आलेला नाही. आता आमची गाठ बाहेरच पडते आणि गप्पा होतात त्याही  खिडकीतूनच.... 


5 comments:

  1. आकांक्षा,

    पोस्ट चांगली आहे.पहिल्या पावसानंतर सृष्टीमध्ये काय बदल होतात, हे पाहायला प्रत्येकालाच आवडतात.(या माझ्या समजाला बहुतेक तडा जाणार नाही.)शाळेत असताना जून महिन्यातला पाऊस हमखास आठवतो. कॉलेजमध्ये गेल्यावर त्या पहिल्या पावसाला काही वेगळे हुरहूर लावणारे संदर्भ मिळतात. पहिल्या पावसात कटिंग चहा घेण्यात जो 'मझा' आहे, त्याबद्दल बोलायला नकोच. तो घेताना कुणी बरोबर असलं तर ती चव वाढते, याबद्दल तर अजिबातच बोलायला नको. ती गोष्ट मनातल्या मनात अनुभवावी अशीच.
    होय ना ?

    ReplyDelete
  2. Thanks, Kedar
    खरंय तुझं, पहिल्या पावसावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकते...

    ReplyDelete
  3. पोस्ट चांगली आहे

    ReplyDelete
  4. अजून जास्त लिहिले असते तरी चालले असते...
    पावसाच्या आमच्याही काही आठवणी-
    http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/06/blog-post.html

    ReplyDelete