Monday, January 26, 2015

अखेर त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली…

गेल्या काही दिवसांपासून जी बातमी येऊ नये असं वाटत होतं, ती बातमी अखेर आली. आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या ‘common man’ ला जन्म देणार्‍या आर. के. लक्ष्मण यांनी अखेर आपला निरोप घेतला.

लिहिता-वाचता येण्यापूर्वीच, म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या पहिल्या दशकापासूनच नियतकालिकांमधल्या रेखाचित्रांमध्ये गुंगून जाणार्‍या एका छोट्या मुलानं पुढं अनेक दशकं असंख्य भारतीयांना आपल्या रेखाचित्रांमध्ये गुंगवून ठेवलं. रेषांचं सामर्थ्य काय असतं हे दाखवून देऊन त्यांनी आपलं लक्ष्मण हे नाव जणू सार्थ ठरवलं. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश न मिळाल्यानं खचून न जाऊन त्यांनी आपली पेन्सिल खाली ठेवली नाही, हे आपलं सद्भाग्यच!
‘टाइम्स ऑफ इंडिया’ मधून आपल्याला भेटायला येणार्‍या या ‘common man’ नं तत्कालीन परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी केलीच, पण त्याचबरोबर अनेकदा ही टिप्पणी कालातीत बनून गेली. उदाहरणादाखल हे रेखाचित्र,

त्यांचे ज्येष्ठ बंधू आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ साठी त्यांनी काढलेली चित्रंदेखील तितकीच बोलकी होती. त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेला आणखी एक दोस्त म्हणजे एशियन पेंट्सचा ‘गट्टू’. 
त्यांनी रेखाटलेलं प्रत्येक पात्र हे अगदी साधं आणि आपलंसं वाटतं. त्यामुळेच आज एका कलाकाराला मुकल्याचं दुःख आहेच, पण त्याचबरोबर आपल्या अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी पोकळी निर्माण झालीये. 

2 comments: