Saturday, March 26, 2011

केल्याने देशाटन -२ ...

'स्वामी' कादंबरीत माधवराव रमाबाईंना म्हणतात - "ओहोटीच्या वेळी मोकळ्या पडलेल्या किनाऱ्यावर जेव्हा समुद्र-खेकडे रांगोळ्या घालू लागतील, तेव्हा तुझा अभिमान पार धुऊन जाईल आणि तू कौतुकानं त्यांनी रेखाटलेल्या कलाकृती बघत राहशील. " असंच आपलं  खुजेपण आणि निसर्गाचं श्रेष्ठत्व पदोपदी जाणवत राहतं. अथांग सागर अंत:करणाची विशालता देतो, तर डोंगरावरून कोसळणारा धबधबा इतरांसाठी जीव झोकून द्यायला शिकवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीवेळेला सारखाच रंग धारण करणारा सूर्य "संपत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता " हे दाखवून देतो. शिंपल्यातून अचानक बाहेर येणारी गोगलगाय जशी दचकायला लावते, तसाच समुद्रात लाटेमुळे "पायाखालची वाळू सरकणे", या वाक्प्रचाराचा प्रत्यक्ष येणारा अनुभव हृदयाचा ठोका चुकवतो. 

 इतिहासाच्या माध्यमातून भेटणारी माणसंही असंच खूप काही शिकवून जातात. हिरकणी बुरुजावरून खाली डोकावून पाहिलं की आजही आपले डोळे फिरतात. मग अशा जागेवरून अंधारात, जंगलात उतरण्याचं धाडस करणाऱ्या हिरकणीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो. गड बांधण्याच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी बक्षीस देऊ केले असता, पायरीच्या दगडावर "सेवेचे ठायी तत्पर, हिराजी इंदूलकर ", असे लिहिण्याची परवानगी मागणारा हिराजी निरपेक्ष सेवेचा उत्तम आदर्श घालून देतो. "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" असं सांगणारा तानाजी मालुसरे राष्ट्रहित महत्वाचे असल्याचा संदेश देतो, तर राजे सुखरूप गडावर पोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत सिद्दी जौहर आणि यमराज दोघांनाही घोडखिंडीत थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे असीम कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण बनून राहतात. आणि हा असा  त्या त्या जागी जाऊन इतिहासाचा पुन:प्रत्यय घेण्याचा प्रयत्न केला की मग हे केवळ पुस्तकी दाखले न राहता, जीवनपथावर पदोपदी मार्गदर्शक ठरणारे प्रसंग बनतात. शिवाय पुस्तकातला इतिहास जणू सजीव झाल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.      
   
पण केवळ इतिहासातच चांगली माणसं होऊन गेलीत असं थोडंच आहे. आजही आपल्याभोवती अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांच्याकडून आपल्याला खूप शिकायला मिळू शकतं. अशाच काहींच्या भेटीचा योग सहलीच्या निमित्तानं येतो - मग ते आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ. अरविंद परांजपे असतील, वा आपल्या कथाकथनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे सु. ह. जोशी असतील. श्रोत्यांना आपलंसं करून घेणं, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सारखंच महत्त्व देणं, या अशांच्या वैशिष्ट्यांमुळे नकळत आपणही ते गुण उचलतो. आपलं पद, प्रतिष्ठा यांचा विचार न करता इतरांबरोबर समरस होऊन राहणारी माणसं सहलीत बघायला मिळतात. एकदा आम्ही कोकणातला एक कौलांचा कारखाना बघायला गेलो होतो. कारखाना बघताना एक काका  आम्हाला कारखान्याची माहिती देत होते. त्या कारखान्यात नोकरी करणाऱ्यांपैकीच  ते असावेत असा आमचा अंदाज होता. संपूर्ण कारखाना बघून झाल्यानंतर आम्हाला कळलं, की ते त्या कारखान्याचे मालक श्री. जोगळेकर होते. आता एवढ्या मोठ्या उद्योगाचा मालक दीड - दोन तास आपल्याशी गप्पा मारत फिरत होता, ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. तशीच गोष्ट महाबळेश्वरच्या श्री. आगरकरांची. त्यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रात आम्ही गेलो असता, मधमाश्यांच्या प्रकारांपासून ते मधाच्या प्रकारांपर्यंत साऱ्या प्रक्रियेची माहिती त्यांनी अतिशय साध्या शब्दांत आणि उत्साहानं दिली. ही अशी माणसं भेटली, की "विद्या विनयेन शोभते", या सुवचनाची सत्यता पटते. 

या थोरामोठ्या मंडळींप्रमाणेच, आजूबाजूची सामान्य माणसं आणि इतकंच नव्हे, तर आपली मित्रमंडळी देखील नकळतपणे खूप काही देऊन जातात. त्यांच्याबद्दल बोलूयात, पुढच्या भागात. 

No comments:

Post a Comment