Friday, April 1, 2011

केल्याने देशाटन - ३ ...


आजपर्यंत बोललो, ते आदर्शांबद्दल ... आज थोडं आपल्यासारख्यांकडून घेता येणाऱ्या गोष्टींबद्दल... 
गोव्यात जसा समुद्र पहिला, तशीच  आम्ही "मातृछाया " आणि "स्नेहमंदिर" या समाजमन्दिरांनाही भेट दिली. मातृछायातली निरागस मुलं आजही आठवतायत. स्नेहमन्दिरामधल्या आजी-आजोबांशी बोलताना जे समाधान मिळालं, ते अगदीच अवर्णनीय होतं. बा. भ. बोरकरांनी एका कवितेत म्हटलंय- 
" देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके , चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे " 
अशी अनेक तृप्त जीवनं तिथे पाहायला मिळाली. त्यांच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी ऐकताना जीवनाचे अनेक पैलू नव्यानं उलगडले गेले.


असंच, जीवनाचं एक नवं रूप बघायला मिळालं, ते जव्हार-देवबांधच्या आदिवासी वस्त्यांवर. जेव्हा  सूर्यमाळच्या पठारावर आमची गाडी थांबली, तेव्हा एस. टी. बघायला गोळा झालेली मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं अप्रूप अजूनही डोळ्यांपुढे येतंय. एस. टी. बघून त्यांना झालेला आनंद पाहिला आणि मग आपण किती सुखी आयुष्य जगतो याचा प्रत्यय आला. "मला लाल डब्यानं जायला नाही आवडत, व्होल्वोनी जाऊ किंवा आपली कार नेऊ ", अशी फर्माईश करणाऱ्यांना, लाल डब्यात बसणं तर सोडाच, पण लाल डबा बघायला मिळणंच, काहींसाठी इतकं महद्भाग्य ठरतं हे कळलं, तेव्हा मिळालेलं शहाणपण हे बाकी कोणत्याही शाळा-कॉलेजच्या शिक्षणानं आलं नसतं.
"I had the blues, as I had no shoes, 
until upon the street, I met a man who had no feet." 
अशाच प्रकारची काहीशी आमची परिस्थिती होती. पुस्तकात, वर्तमानपत्रात वाचलेलं 'कुपोषण', तिथल्या मुलांमध्ये प्रत्यक्षात पाहिलं आणि मग आपले जेवतानाचे नखरे कमी करायला हवेत, हे मनोमन पटलं. आजही पानात काही शिल्लक उरेल असं वाटत असतानाच, त्या मुलांचे चेहेरे आठवतात आणि मग आपोआपच नावडते पदार्थदेखील संपवले जातात. दुरून , उन्हात अनवाणी पायांनी पाण्याचे हंडे भरून घेऊन येणाऱ्या छोट्या छोट्या मुली पाहिल्या आणि पाण्याचंही जीवनमूल्य पटलं. अशा परिस्थितीत जगत  असतानाही त्यांनी आनंदानं केलेली नृत्यं पाहिली आणि मग जाणवलं की सुख-समाधान हे बाह्य परिस्थितीवर नव्हे तर मनस्थितीवर अवलंबून असतं.

आणि हो, हे सारं आपण ज्यांच्यासोबत अनुभवतो, त्या सहप्रवाशांकडूनही खूप काही शिकायला मिळतं बरं का... घरात आपल्या सख्ख्या बहीण-भावांशी भांडणारेही तिथे आपलं आवरून झालं की अगदी उत्साहात  एखाद्या छोट्या दोस्ताची bag भरून द्यायला मदत करतात.  मोठ्या ताई-दादांना काम करताना पाहून, "काकू मी नाश्त्याच्या प्लेट्स गोळा करू का ?", असं स्वत:हून विचारणारे मित्रही भेटतात.  आपल्यापेक्षा लहान असून देखील सहलीतल्या प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगू शकणारा एखादा मित्र आपल्यालाही अवांतर वाचनाला प्रवृत्त करतो. सहलीत मित्राच्या वाढदिवसासाठी दोन मिनिटात सुंदरशी रांगोळी काढणारी ताई किंवा रोज नवनवीन गाणी/स्तोत्रे सांगणारा दादा पाहिला की  आपणही एखादी कला जोपासली पाहिजे असं वाटायला लागतं. रात्री सगळ्यांच्या नंतर झोपून, सकाळी सगळ्यांच्या आधी उठणारे आणि तरीही दिवसभर सगळ्यांपेक्षा जास्त काम करणारे काका-काकू बघितले की - "मन उत्साही असेल तर शरीरही न थकता साथ देतं", हे पटतं, आणि मग हे सारं पाहिलं की आपल्याही नकळत बदल घडून येतात. 

"मला कोणीच माझ्या सामानाला हात लावलेलं आवडत नाही", असं म्हणणारी मुलगीच पुढच्या सहलीत स्वत:हून आपल्याकडचं जास्तीचं पांघरूण कोणाला हवंय का असं विचारते. यंदा आपण मला दोन ऐवजी एकच नवा ड्रेस घेऊन, उरलेले पैसे देवबांधच्या 'भाऊबीज निधी'ला पाठवूयात का, असं कोणीतरी आई-बाबांना सुचवतो. "काका, पुढची सहल कुठे जाणार ते सांगा, म्हणजे मी माहिती गोळा करून ठेवतो", असं कुणीतरी म्हणतं, तर "काकू, या वेळी रोज सकाळी सगळ्यांना बिस्किटे देण्याचं काम मी करणार हं", असंही कुणीतरी म्हणतं. 

हे सगळं घडतं याचं कारण - माणसाचं मन हे टीपकागदासारखं असतं. दिसतं ते टिपून घेणारं. म्हणूनच जर आपलं मन अधिकाधिक संवेदनशील बनवून, एक परिपूर्ण व्यक्ती बनायचं असेल, तर हा असा सहलीचा अनुभव हवाच...   

4 comments:

  1. Abhinandan! Blog suru kelyabaddal! Aata wel milel tashya wachen ek ek post.

    ReplyDelete
  2. धन्यवाद... तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहेन ...

    ReplyDelete
  3. "माणसाचं मन हे टीपकागदासारखं असतं. दिसतं ते टिपून घेणारं."
    very true!! It would be better if it had the qualities of some filter paper as well. Then one wouldn't have learnt what one shouldn't.

    ReplyDelete
  4. exactly, might be in the course of evolution, human minds may start functioning like filters...

    ReplyDelete