Thursday, March 14, 2013

सफर संभाव्यतेच्या विश्वातील - २

सफर संभाव्यतेच्या  विश्वातील - १

“To understand God's thoughts we must study statistics, for these are the measure of his purpose.”
- Florence Nightingale

मार्च महिना म्हटलं  की  आठवण होते ती आंतरराष्ट्रीय महिला दिनाची. म्हणूनच आज दोन महिला संख्याशास्त्रज्ञांचा परिचय करून घेऊयात. त्यांपैकी पहिली म्हणजे फ्लोरेन्स नाईटिंगेल.  परिचारिका म्हणून तिचं काम आपल्याला माहित असतं. पण हीच नाईटिंगेल संख्याशास्त्राच्या क्षेत्रातही नावाजलेली आहे.  १८५९ मध्ये 'Royal Statistical Society' ची पहिली  महिला सभासद  होण्याचा सन्मान नाईटिंगेलला लाभला. माहितीचं  सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा आलेखात रुपांतर करण्याचं  तिचं  कौशल्य वाखाणण्याजोगं होतं . त्यामुळेच दुर्लक्षित राहिलेला सैनिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यात तिला यश मिळालं . त्यापूर्वीचे संख्याशास्त्रीय अहवाल भलेमोठे, किचकट असल्याकारणानं सहसा राजकारण्यांकडून वाचले जात नसत. त्यामुळे त्या अहवालातील समस्यांवर उपायही शोधले जात नसत. याउलट चित्रात्मक मांडणीमुळे नाईटिंगेलचे अहवाल लोकांना सहज समजले आणि त्यामुळे समस्येचं गांभीर्य लक्षात येऊन  त्यावर उपाययोजना केल्या गेल्या.
संख्याशास्त्राच्या क्षेत्रातील नाईटिंगेलचं सर्वात महत्त्वाचं  योगदान म्हणजे,  तिने प्रकाशात आणलेले नाईटिंगेल रोझ प्लॉट.  आजकाल मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 'पाय आकृती'चंच हे दुसरं  रूप. वर्तमानपत्रात  पाय आकृती आपण नेहमीच पाहतो. विशेषत:  'रुपया असा आला, असा गेला' किंवा 'वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचणाऱ्या  लोकांचे प्रमाण' अशा प्रकारच्या माहितीचं रुपांतर रंगीबेरंगी पाय मध्ये केलं जातं.  याचंच थोडं वेगळं  रूप म्हणजे नाईटिंगेल रोझ प्लॉट. या  आकृतीचा वापर साधारणत: मासिक/साप्ताहिक  माहितीसाठी केला जातो. याचं  वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळाच्या प्रत्येक पाकळीचा कोन हा सारखाच असतो. पण प्रत्येक पाकळीची त्रिज्या (लांबी), ही वेगवेगळी असते. त्यामुळे मूळ पाय आकृतीप्रमाणेच यातही पाकळीचे क्षेत्रफळ हे त्या क्षेत्राच्या योगदानाच्या प्रमाणात असते. 
Nightingale Rose Plot
भारतीयांशी देखील नाईटिंगेलचे विशेष नाते आहे. १८६३   ते १८७३ या दहा वर्षांच्या कालावधीत नाईटिंगेलच्या प्रयत्नांमुळे भारतातील सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण हजारी ६९ वरून १८ वर आले.


अशीच दुसरी एक संख्याशास्त्रज्ञ म्हणजे जेनेट लेन क्लेपन.  क्लेपन ही देखील  खरं  तर वैद्यकीय क्षेत्रात होती. १९१२   साली तिनं पहिला 'Cohort Study' केला. Cohort म्हणजे काहीतरी एक गुणधर्म समान असणाऱ्या अनेक लोकांचा समूह. साधारणत: एकाच वेळी जन्माला आलेल्या १००० मुलांच्या वाढीचा तिनं अभ्यास केला. यांपैकी ५००  मुलांना आईचं दूध दिलं  गेलं  होतं  तर उरलेल्या ५००  मुलांना गाईचं दूध देण्यात आलं होतं. संख्याशास्त्रातील 't -test' आणि इतर काही साधनांचा वापर करून आईचं  दूध मिळालेल्या मुलांची वाढ अधिक चांगल्या रीतीनं होत असल्याचं  तिनं सिद्ध केलं. हा फरक आर्थिक स्थिती अथवा इतर कारणांवर अवलंबून नाही किंवा निव्वळ योगायोगही नाही हेही तिनं संख्याशास्त्रीय साधनांनी दाखवून दिलं.
पुढच्या काळात तिने 'Case Control Study' करून स्तनाच्या कर्करोगाची कारणे शोधून काढली. ५०० कर्करोगी महिला (Case) आणि साधारण समान स्थितीतील (वय, सामाजिक स्तर इत्यादी) ५०० इतर महिला (Control) यांच्याकडून  भरून घेतलेल्या ५० प्रश्नांच्या प्रश्नावलीतील उत्तरांवरून संख्याशास्त्राच्या साह्याने तिने कर्करोगाची कारणे  शोधून काढली. नंतरच्या काळात इतर संशोधकांनीही तसेच निष्कर्ष काढल्यामुळे  तिने दिलेली कारणे  आजतागायत वापरली जातात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात दुहेरी डॉक्टर (MD + PhD) पदवी मिळवणाऱ्या फार थोड्या लोकांपैकी एक क्लेपन होय.
आजच्या पाय दिनाच्या दिवशी या दोन महिला संख्याशास्त्रज्ञांना अभिवादन करून थांबते.

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. गणितासंबंधीच्या क्षेत्रातील महिलांचे काम, हा खरंतर दुर्लक्षित विषय आहे. त्यावर फारसं कुणी लिहीत/बोलत नाही. हार्डीच्या मते पण "Mathematics is a game of young "Men"!" आहे! हे विधान निखालस अयोग्य आहे म्हणा!
    या लेखात तीन महिला संख्याशास्त्रज्ञांबद्दल वाचायला मिळाले! छान वाटले.

    ReplyDelete