Saturday, December 31, 2011

गोष्ट खासा-जीझोची - जपानी नववर्षाची


जपानच्या एका डोंगरावर एक आजी - आजोबा राहत होते.  खासा (वेताच्या टोप्या) विकून ते आपला उदरनिर्वाह करीत. नवीन वर्ष सुरु होण्याच्या आदल्या दिवशी घडलेली ही गोष्ट. आजी आजोबांना म्हणाली, "उद्या नवीन वर्ष सुरु होणार. केक बनवायला सामान आणायला हवं." आजोबा म्हणाले, "तू काळजी करू नकोस. मी बाजारात जाऊन  खासा  विकतो आणि मिळालेल्या पैशातून सामान घेऊन येतो."

पाच खासा घेऊन आजोबा बाजारात गेले. दिवसभर त्यांनी खूप प्रयत्न केला; पण त्या खासा कोणी घेतल्याच नाहीत. निराश होऊन आजोबा परतीच्या वाटेला लागले. थंडी वाढू लागली होती. हिमवृष्टीही सुरु झाली. अचानक आजोबांचा लक्ष एका जीझोकडे गेलं. गावाचं आणि विशेषतः लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी असे जीझो  (पुतळे) असत. बघता बघता बर्फाने झाकले गेलेले सहा जीझो आजोबांना दिसले. आजोबांनी हात लावून पाहिलं. बिचारे जीझो चांगलेच गारठले होते. आजोबांना त्यांची दया आली. आपल्यासोबतच्या खासा काढून त्यांनी जीझोंना घालायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडे पाचच खासा होत्या आणि जीझो तर सहा होते. इतक्यात आजोबांना काही तरी सुचलं. ते सहाव्या जीझोकडे गेले आणि आपल्या डोक्यावरची खासा काढून त्याला घालत म्हणाले, "ही काही तितकी नवी नाही, पण तरी थोडी थंडी तर नक्कीच कमी करेल ती." आणि समाधानाने आजोबा घरी परतले.
थंडीत कुडकुडणाऱ्या, बर्फानं माखलेल्या आजोबांना पाहून आजी म्हणाली, "अरे तुमची खासा कुठं गेली? ". आजोबांनी सारी गोष्ट आजीला सांगितली. केकचं सामान आणता आलं नाही म्हणून त्यांना वाईटही वाटत होतं. पण आजी त्यांना म्हणाली, "छानच केलंत तुम्ही. केक नाही केला तरी काही बिघडणार नाही." आणि दोघंही आनंदानं झोपी गेले.
रात्री अचानक मोठ्या आवाजानं आजी - आजोबा जागे झाले. कोणीतरी बर्फात चालत, गात येत असल्याचा आवाज येत होता.  आजी - आजोबा दोघे उठून बाहेर आले. जसजसं ते बाहेर येऊ लागले, तसे गाण्याचे बोल स्पष्टपणे ऐकू येऊ लागले.
"A kind old man walking in the snow
Gave all his hats to the stone Jizo.
So we bring him gifts with a yo-heave-ho!"
दार उघडून पाहतात तो काय, दारात सुंदरसा केक ठेवलेला होता आणि दूरवर ते खासा घातलेले सहा जीझो बर्फात आपल्या पाऊलखुणा ठेवत जात असलेले त्यांना दिसले.
मग काय मंडळी, कशी वाटली गोष्ट. एकूण काय तर जपान असो वा भारत वा आणखी कुठला देश ... सर्वांवर प्रेम करा आणि गरजूंना मदत  करा, असाच संदेश या साऱ्या लोककथा देतात.

5 comments:

  1. chan ahe goshta...mala avadli...

    ReplyDelete
  2. खूप सुंदर गोष्ट. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. Mala purn gosht samazli!!!

    I hope I m right ;) :) !!

    ReplyDelete
    Replies
    1. होय ऋचा, तुझं वाक्य बरोबर आहे !

      Delete