Thursday, May 26, 2011

गंधर्वयुग

काल बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा योग आला. अर्थातच it was worth it…. आमच्या पिढीला गन्धर्वयुगाच्या सुवर्णकाळाची सफर घडवून आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे ….

सकाळ मधल्या सुबोध भावेंच्या लेखनातून चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झाली होतीच; पण ती उत्सुकता शमवतानाच बालगन्धर्वांविषयी अधिक माहिती घ्यायलाही उद्युक्त करण्याचं काम या चित्रपटानं केलंय . एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी झटलं की कसा उत्तम कलाविष्कार साकार होतो , याचं उदाहरण म्हणून या कलाकृतीकडं पाहता येईल …

सुबोध भावेंचा राजस बालगंधर्व मनात घर करतोच , पण त्याचबरोबर “मामा , गंधर्व म्हणजे काय रे ?”, असं निरागसपणे विचारणारा अथर्व कर्वेही आपल्या छोट्याश्या भूमिकेत ठसा उमटवून जातो . बालगंधर्वांची रसिकता, विनम्रता , कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती , उत्कृष्टतेचा ध्यास , अनेकानेक आघात पचवण्याचं धैर्य , रसिकांवरची श्रद्धा , तत्त्वनिष्ठा आणि “इदं न मम ” अशी निरासक्त वृत्ती , अशा बहुविध पैलूंचं इतक्या अल्प कालावधीत प्रत्ययकारी दर्शन घडवण्याचं शिवधनुष्य नितीन देसाईंच्या नेतृत्त्वाखाली या साऱ्या मंडळींनी अतिशय उत्तमरीत्या पेललंय . पण त्याचबरोबर त्यांच्या अव्यवहारीपणा सारख्या काही उण्या बाजूही अगदी सहजगत्या समोर आणल्यायेत . आणि हे सगळं केलंय ते कुठंही “judgmental ” न होता … कारण , चित्रपटात म्हटल्याप्रमाणं गंधर्वांच्या आयुष्याला लौकिक बंधनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणंही निष्फळ आहे …. . शिवाय , सहकाऱ्यांचं प्रेम आणि कळकळ, रसिकांचं प्रेम आणि त्यातूनच उमटणारी दानशूरता , सहचारिणीची सोशिकता या गोष्टी झाकोळल्या जाणार नाहीत याचीही पुरेपूर दक्षता दिग्दर्शकानं घेतलीये . 

मुलीच्या मृत्यूनंतर डोळ्यात आलेलं पाणी क्षणार्धात टिपून भूमिका रंगवणारे बालगंधर्व आपल्या डोळ्यात अश्रू उभे करतात , तर बोलपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी होणारी एका सच्च्या रंगकर्मीची घुसमट आपल्यालाही अस्वस्थ करून सोडते . आणि हे सगळं पाहिलं की पटतं – “खरंच, आयुष्य हे तर एक नाटकच. त्याचे प्रवेश “त्यानं” आधीच लिहून ठेवलेत . फक्त आपल्या वाटेला आलेली भूमिका उत्तमरीत्या पार पाडणं हेच आपलं कर्तव्य”.


PS: १. आनंद भाटेंचा देखील विशेषत्त्वाने उल्लेख करायला हवा.
      २. आता कुठूनतरी “धर्मात्मा” मिळवायला हवा ….


2 comments:

  1. Hmmm interesting! mazihi utsukata vadhali aahe aata. Baghuyat kadhi milatoy baghayala ha simema te!

    ReplyDelete
  2. इतकी जुनी नाट्यपदे आजच्या पिढीला ऐकायला मिळावी हीच खूप मोठी गोष्ट आहे
    नितीन देसाई, कौशल इनामदार, सुबोध भावे आणि आनंद भाटे यांचे विशेष कौतुक!

    ReplyDelete