जपानी ( 日本語 ) शिकताना - 1
आमचा जपानीचा क्लास सुरु झाल्यावर थोड्याच दिवसात म्हणजे 6 ऑगस्टला "तानाबाता फेस्टिवल" होता. आकाशगंगेमुळे एकमेकांचा विरह सहन कराव्या लागणाऱ्या ओरिहीमे आणि हिकोबोशी या दोन ताऱ्यांचा भेटण्याचा दिवस म्हणजे हा सण. ओरिहीमे ही तेन्तेईची (आकाशाच्या राजाची) मुलगी. लग्नानंतर दोघांचंही आपआपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ लागल्यानं चिडून तेन्तेईने दोघांना आकाशगंगेच्या दोन बाजूंना टाकलं. विरहानं दु:खी झालेल्या ओरिहीमेवर दया आल्यानं मग तेन्तेईने वर्षातून एकदा म्हणजे चांद्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी दोघांना भेटण्याची परवानगी दिली. तो दिवस म्हणजे तानाबाता फेस्टिवल. ही सारी गोष्ट ऐकताना चंद्र-दक्ष-रोहिणी यांची चंद्राच्या क्षय-वृद्धी संबंधातली कथा आठवली. आणि जाणवले, संस्कृती भारतीय असो की जपानी की आणखी कुठली. सण - उत्सवांच्या कथांचा मूळ गाभा तोच.

नंतर आले ते कोरे, सोरे, आरे, दोरे. थोडक्यात हे, ते, ते तिथले आणि कोणते. यांच्यानंतर "वा" पार्टिकल लावून "कोरे वा कोकुबान देस" म्हणजे "हा फळा आहे", अशी वाक्ये सुरु झाली. मग कुणीतरी शोध लावला. बहुदा "दुरून डोंगर साजरे " प्रमाणे जपानी लोकांना दूरच्या वस्तू आवडतात. म्हणून दूरच्या वस्तूबद्दल बोलायची सुरुवातच " आरे वा" अशी होते. हे सारं अचल वस्तूंसाठी. साधारण अशाच धर्तीवर चल - अचल सर्वांसाठी चालणारे हे, ते, त्या तिथले आणि कोणते म्हणजे कोनो, सोनो, आनो, दोनो . इथे, तिथे, त्या तिकडे आणि कुठे असं जागेबद्दल बोलायचं झाला की कोको, सोको, आसोको, दोको; दिशांबद्दल बोलायचं झालं की कोचिरा, सोचिरा, आचिरा, दोचिरा; अशी को, सो, आ, दो ची जणू नवी बाराखडीच शिकायला मिळाली.
त्यानंतर शिकवली गेली ती वेगवेगळ्या देशांची जपानीतील नावे. भारत, इंडिया, हिंदुस्तान इतकी नावे कमी आहेत की काय म्हणून आता जपानीत भारताला "इंदो" म्हणायचं हे कळले. तीच गत आपल्या शेजाऱ्याची . चायना, चीन आणि आता च्यूगोकू . "देशवासीय" म्हणजे "~जिन ". म्हणजे आपण सारे "इंदोजिन". एकूणच या साऱ्यामुळे "भाषा" या प्रकाराचा धसका बसला की मग कुठल्याही भाषेचं नाव काढलं की पळून जायची इच्छा होणार, हे जाणूनच बहुदा प्रत्येक भाषेच्या नावानंतर “go” लावायची पद्धत आहे जपानीत. आपली मातृभाषा मराठीगो, राष्ट्रभाषा हिंदीगो आणि सध्या आपण शिकतोय निहोन्गो.
शिवाय नम्रपणे बोलायचं झालं तर शक्यतो आपल्या समोरच्या व्यक्तींना कधीही तू / तुम्ही म्हणायचं नाही . समजा वीणा नावाच्या मुलीला, तुला काय आवडतं , असं विचारायचं असेल तर “तुम्हाला काय आवडतं ” असं न विचारता “वीणासानला काय आवडतं ” असं विचारायचं . म्हणजे एखाद्या भारतीयानं हे ऐकलं तर अगं मग ती कोण वीणा तिलाच विचार नं, दुसऱ्यांना कशाला विचारतेस असा अनाहूत सल्ला येणार. पण मग थोडा विचार केला आणि “आऊसाहेबांची काय आज्ञा आहे आमच्यासाठी?” असं जिजाऊना आदरपूर्वक विचारणारे शिवराय आठवले.
एकूणात काय तर दोन भाषांमधली साम्यस्थळे आणि भेदस्थळे यांचा अभ्यास करणं हे मजेशीर ठरतंय.