खूप दिवसांपासून, खरं तर खूप वर्षांपासून एखादी परदेशी भाषा शिकायचा विचार करत होते. पण काही न काही कारणानं ते टळतच गेलं. शेवटी मागच्या जून - जुलैत सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि ऑगस्ट मध्ये अस्मादिकांचं जपानी प्रशिक्षण सुरु झालं. जपानी, चीनी भाषा म्हटलं की पहिली आठवते ती किचकट चित्रलिपी. त्यामुळेच बहुदा मी कुठलीही युरोपीय भाषा न निवडता जपानी निवडली. शिवाय शिस्तप्रिय आणि कमी साधनसंपत्तीच्या जोरावरही समृद्ध, प्रगत बनलेल्या, अणुबॉम्बमुळे बेचिराख होऊनही फिनिक्सप्रमाणे उड्डाण करणाऱ्या जपान बद्दल इतर देशांपेक्षा जरा जास्तच आपुलकी होती ती वेगळीच.
“はじめまして(हाजीमेमाश्ते)” असं म्हणून एकमेकांशी ओळख झाली आणि मग सारे वर्गमित्र हे ~さん(सान) बनले. प्रत्येकाच्या नावानंतर सान लावूनच हाक मारायची जपानी नम्रता अंगी बाणवायचा प्रयत्न सुरु झाला. स्वाती 先生 (सेन्सेई - teacher) आणि हर्षदा 先生 च्या मदतीनं, आम्ही जपानीच्या बालवाडीत प्रवेश केला. जपानला जपानीत “ 日本 (निहोन किंवा निप्पोन)” म्हणतात हे ऐकून "इंडिया - भारत"ची आठवण झाली आणि एक समान धागा मिळाला. जपानी राष्ट्रध्वजाचं वर्णन आणि इतर तांत्रिक माहिती घेऊन आमचा वर्ग सुरु झाला.
सुरुवातीला फक्त मौखिक असणाऱ्या या भाषेत आता ३ लिपी आहेत – हिरागाना, काताकाना आणि कांजी . हिरागाना आणि काताकाना या प्रत्येकी ४६ अक्षरांच्या वर्णमाला आणि कांजी ही पारंपारिक चीन कडून आयात केलेली चित्रलिपी. कांजींची संख्या तर हजारोत. त्यामुळे यंदा आपल्याला हिरागाना, काताकाना आणि १५० कांजी शिकायच्या आहेत हे ऐकून धडकीच भरली. चौकोनात प्रमाणबद्धपणे आणि ठराविक दिशेने आणि क्रमाने रेषा काढून वहीत उमटणारी अक्षरं मनाला आनंद द्यायची. पण हीच अक्षरं त्याच्या रेषाक्रमासह (stroke order) लक्षात ठेवणं अवघड जाई. शिवाय, अक्षरांचे उच्चार आठवणं म्हणजे अजूनच तारांबळ. हिरागानातला “से” थोडा थोडा देवनागरीतल्या “ए” सारखा दिसतो. मग इतक्या वर्षांपासूनच्या “ए ” ला क्षणभरापुरतं विसरून “से” म्हणणं, फारच अवघड होतं. मग थोड्या दिवसात आलं ते 日本語初歩 (निहोन्गो शोहो) नावाचं पाठ्यपुस्तक. त्यामुळे लेखन, वाचन आणि संभाषण अशा तीन पातळ्यांवर भाषा विकासाचे आमचे प्रयत्न सुरु झाले. शुभ प्रभात, शुभ रजनी या नेहमीच्या शुभेच्छांसोबतच घरातून बाहेर पडणं, परत येणं, जेवण सुरु करणं, संपवणं, दुकानात येणं इत्यादी अनेक गोष्टींसाठीचे नवनवे शुभेच्छासंदेश आमच्या शब्दकोशात भर टाकत होते. मराठी - हिंदी - इंग्लिश पेक्षा जाणवलेलं प्रमुख वेगळेपण म्हणजे अनेकवचनांचा अभाव. एक झाड पण की आणि अनेक झाडे पण कीच. इथंही इतक्या वर्षांपासून डोक्यात घट्ट बसलेल्या की म्हणजे किल्ली या समीकरणाला छेद द्यावा लागत होता. पण वचन एकच असलं तरी अनेक वस्तू झाल्या की मोजाव्या लागणारच. आजवर या चराचर सृष्टीतील यावज्जीव सजीव - निर्जीवांना मोजण्यासाठी १, २, ... या एकाच अंक - तागडीत तोलायची सवय होती. पण जपानीत तर माणूस, प्राणी, पक्षी, लांब वस्तू, इमारती, यंत्रे, सपाट वस्तू अशा अनेक तऱ्हेच्या वर्गवारींसाठी स्वतंत्र मोजणी तक्ते. ते सारे लक्षात ठेवून सुयोग्य जागी वापरताना नाकी नऊ येत. मग आले विशेषण – क्रियापदांचे प्रत्येकी २ आणि ३ प्रकार. पुढे पुढे जशी मोठी वाक्यं आली तशी भारतीय भाषा आणि जपानीतली समानता दिसायला लागली. त्यामुळेच, जपानी वाक्यं इंग्लिश पेक्षा मराठी -हिंदीत अनुवादित करणं सोपं जात असे. शिवाय, करून ठेव, बघून घे, करून बघ अशी दुहेरी क्रियापदंही जपानीत आहेत.
अशा अनेक गोष्टींचा वेध घेत घेतच वर्ष संपलं. सध्या इथेच थांबते. उरलेल्या वैशिष्ट्यांवर परत कधीतरी बोलूयात. じゃまた( ज्या -माता) .